अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेने मालमत्ता कराची आकारणी करताना ते इमारतीच्या क्षेत्रफळानुसार करावी. मालमत्ता धारकाच्या भाड्याने दिलेल्या रकमेवर करू नये, तसेच भाड्याच्या दराने केलेली आकारणी रद्द करून मालमत्ता धारकांना घरपट्टी भरण्यास परवडेल अशा पद्धतीने आकारणी करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
महापलिकेने इ. इन्फो सिस्टीम लि. या संस्थेची नियुक्ती केली होती. त्यानुसार त्या संस्थेने पुनर्मूल्यांकन केलेले आहे. ते करताना महानगरपालिकेने भाडेकरी देत असलेल्या भाड्यावर कर आकारणी करिता कर योग्य मूल्य निश्चित केलेले असून त्यानुसार कुळांना (मालमत्ताधारक) नोटिसा पाठविलेल्या आहेत.
अहिल्यानगर शहरातील मालमत्ता धारकाचे एक उदाहरण म्हणून तळ मजला, तीन रूम व पहिल्या मजला तीन रूम असे एकूण आरसीसी बांधकाम असलेल्या ६० चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर हे फक्त निवासी वापरासाठी असल्यास शहरामध्ये असलेल्या दरानुसार त्याचे करयोग्य मूल्य सहा हजार रुपये येत आहे. त्यानुसार सदरील मालमत्ता धारकाला ४३ टक्के सर्व प्रकारचे कर व घनकचरा कर ४८० रुपये असे एकूण ३०६० रुपये घरपट्टी आकारणी केली जाते. परंतु मालमत्ताधारक तळमजला तीन रूम स्वतः वापरतो व पहिला मजला तीन रूम १० हजार रुपये महिना भाड्याने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी दिलेला आहे.
या पहिल्या मजल्यावरील तीन रूमच्या भाड्यानुसार वार्षिक कर योग्य मूल्य हे एक लाख आठ हजार रुपये इतके महानगरपालिका घरपट्टी आकारणीकरीता निश्तीत करते, तसेच त्यामध्ये तळ मजल्यावरील तीन रूमचे कर योग्य मूल्य तीन हजार रुपये समाविष्ट करून एकूण करयोग्य मूल्य एक लाख ११ हजार रुपये वर ४३ टक्क कर व घनकचरा कर ४८० रुपये असे एकूण ४८ हजार रुपये इतकी घरपट्टी आकारणी केली जाते. यामुळे मालमत्ता धारकाचे उत्पन्नाचे साधन म्हणून तयार केलेल्या घरापासून त्याच्यावर मोठ्याप्रमाणात कर आकारणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.










