सासवड-जेजुरी रस्त्यावर बेलसर टोलनाक्याजवळ घडली घटना
पुणे | नगर सह्याद्री
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यातून वारकरी चालत पंढरपूरच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीत सोमवारी (१३ जुलै) दुर्दैवी घटना घडल्याने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सासवड-जेजुरी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. जेजुरीत पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत. अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुयात असलेल्या रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनायाजवळ साईदीप लॉजजवळ सात वारकरी महिलांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. अपघातात चार वारकरी महिलांवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नेमका कसा अपघात झाला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अपघात करणार्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्यात झोपलेल्या एकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना दिवे घाटाच्या पायथ्याशी घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्याची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असावा, अशी शयता पोलिसांनी व्यक्त केली.
पालखी सोहळ्यावर शोककळा
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी महिलांना दिंडीतील ट्रकने धडक दिल्याने जेजुरी परिसरावर शोककळा पसरली. जेजुरी परिसरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांचीम मोठी गर्दी झाली. वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भाविकांनी हळहळ व्यक्त केली.
मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदतः मुख्यमंत्री
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात ३ वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकर्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
सासवड-जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी ः उपमुख्यमंत्री पवार
सोमवारी सासवड-जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकर्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणार्या वारकर्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बर्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अपघातात मृत झालेल्या महिला
मृत वारकरी सांगली जिल्ह्यातील नंदा पवार (वय ६०, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) तर जखमी महिला वारकरी अक्काताई बबन कोळी (शिरगाव), शांता शिवबा कालकोपर (मिरज), कासाबाई रास्ते, लक्ष्मी विठ्ठल गर्दे (कवठेमहाकाळ, जि. सांगली) आणि शामराव चव्हाण (जि. सांगली). हे वारकरी दि. ६ जुलैपासून आळंदीहून पंढरपूरला दिंडी तून पायी चालत निघाले होते.










