शेवगाव | नगर सह्याद्री
शहरातील दूषित, दुर्गंधीयुक्त व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात डॉ. नीरज लांडे, किरण काथवटे व अमोल माने यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी केली.
शहरातील विविध भागांत नळाद्वारे पिवळसर रंगाचे पाणी येत आहे. अनेकदा नळातून शंख-शिंपले व कचरा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या शहरातील अनेक भागात १५ ते १८ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेली महत्त्वाची पाणी योजना गेल्या दहा महिन्यांपासून रखडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
परिस्थिती सुधारली नाही तर मोर्चा काढणार
दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करून जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, नागरिकांना नियमित, स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करावा, संपूर्ण पाइपलाइनची तपासणी करून दोष दूर करावेत, तसेच रखडलेली पाणी योजना तातडीने सुरू करून काम पूर्ण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन, मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.










