- जाहिरात -spot_img

सुदर्शनजी, हाल बेहाल है आपका!; किरण शिंदे खाकी वर्दीला कलंक…

गुटखा तस्करांशी थेट संबंध | गुन्हा दाखल होणार का?
सारिपाट / शिवाजी शिर्के
पोलिस अधीक्षक म्हणून सुत्रे घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शुक्लकाष्ट मागे लागल्यासारखी अवस्था जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन यांची झाली आहे. चोर्‍या, तस्करी, दरोड्यांनी सलामी मिळालेल्या सुदर्शन यांनी वादग्रस्त अधिकार्‍यांच्या बदलीची चावी फिरवल्यानंतर श्रीगोंद्यातील किरण शिंदे या बदमाश पोलिस निरीक्षकाने जाताजाता ‘प्रतापी’ मिठाला जागण्याचे काम केले. बेलवंडी पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. जप्त केलेला गुटखा कस्टडीत ठेवण्याऐवजी गाडीत ठेवला. पुढे ही गाडी कोर्टाच्या आदेशाने सोडण्याची ऑर्डर झाली आणि ती गाडी गुटख्यासह बाहेर सोडली गेली. गाडी सोडण्याची ऑर्डर असताना गुटखा देखील सोडला गेला. तो असाच सोडला नाही. प्रतापी आदेशच तसा होता. किरण शिंदे याने खाल्लया मिठाला जागत बदली होऊन जाताजाता खाकी वर्दीचा इमान काष्टीच्या बाजारात विकला. सुदर्शनजी, कैसा लग रहा नगर का माहोल? सुदर्शनजी वेळ अजूनही गेलेली नाही. तुमची बेअब्रू होण्याच्या आधी किरण शिंदे सारख्या अधिकार्‍यावर कारवाई करा. त्यातच तुमचे आणि खाकी वर्दीचे हित आहे.

एसपी साहेब, इतक्या कमी दिवसांत अशी चुकीची चर्चा तुमच्याबाबत सुरू होऊ नये इतकेच!
गुटखा विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांच्या पथकाने श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन गुटखा पकडला. खरे तर ही कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी करणे अपेक्षीत होते. मात्र, ‘प्रतापी दादा’च्या मिठाला किरण शिंदे हा खाकीतील चोर जागत असल्याने त्याच्याकडून हे अपेक्षीत नव्हतेच. झाले ही तसेच! बेलवंडी पोलिसांनी गुटखा जप्त केला आणि श्रीगोंद्याचा कारभार पाहणार्‍या किरण शिंदे यांच्याकडे दिला. त्यांच्या ताब्यात गुटखा पंचनाम्यासह असताना तो दोन दिवसात पोलिस ठाण्यातून चोरला गेला आणि लांडगे यांच्या शेतात ठेवला गेला. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला आणि तो गुटखा पुन्हा पकडला. त्या गुटख्याच्या गोण्यांवर पंचनामा आणि गुन्हा नंबर दिसताच गुन्हे शाखेच्या पथकाने कपाळावर हात मारला. सुदर्शनजी, खरे तर यात पोलिस अधिकार्‍याचा आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही. कर्मचारी सहभागी असणारच! मात्र, अधिकार्‍याच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. सुदर्शनजी, आता चोरी तुमच्या अधिकार्‍याने तुमच्याच कस्टडीतून केली आहे. तुमचे अधिकारी आणि कर्मचारी तस्करीत गुंतले आणि त्यांनी खाकी वर्दीशी बेईमानी केली हे लपून राहिलेले नाही. एसपी साहेब, तुम्ही यात खमकी भूमिका घेतली नाही तर किरण शिंदे याच्या प्रतापातील वाटा तुम्हाला देखील मिळत असणार, अशी चर्चा होऊ शकते. एसपी साहेब, काळजी घ्या! इतक्या कमी दिवसात अशी चुकीची चर्चा तुमच्याबाबत सुरू होऊ नये इतकेच!

हे सुद्धा वाचा :  भरता प्रमणे भाऊ अपेक्षित असेल तर स्वतः आधी 'राम' व्हा : रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांचे आवाहन

प्रतापने शब्दश: घोडे लावले अन् किरण मान खाली घालून ऐकत राहिला!
गुटखा तस्करीतील बादशाह म्हणून ओळखल्या जाणार्‍याचा आणि पोलिसांना त्या बदल्यात मलिदा देण्यात पटाईत असणार्‍याचा गुटखा पोलिसांनी पकडला. अर्थात बेलवंडी पोलिसांनी तो पकडला अन् श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिला. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि गुटखा जप्त पंचनामा झाल्याची माहिती मिळताच गुटखा तस्कर टोळीचा मुखीया समजल्या जाणार्‍या प्रतापने खांद्यावर तीन स्टार असणार्‍या पोलिस निरीक्षक किरण शिंदे या चाटूगिरीतील अधिकार्‍याला शब्दश: घोडे लावले. आयमाय अन् खाकीची बेईज्जती करणारी भाषा वापरली जात असताना किरण शिंदे हा हे सर्व खाली मान घालून ऐकत राहिला.

एसपी साहेब; असे हजार रवी दळवी, प्रताप अन् विकीला हात लावण्याची हिंमत होणार का?
श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी शिवारातील रवी बबन दळवी याने अमोल लांडगे याच्या शेतातील कांद्याच्या चाळीत प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लांडगे याच्या शेतात दाखल झाले. कांद्याच्या चाळीत पांढर्‍या रंगाच्या गोणपाटात गुंडाळलेला ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. या गोणपटावर गुन्हा नंबर व वर्ष असे लाल अक्षरात लिहिलेले आढळून आले. रवी दळवी यात आरोपी केला गेला असणार! मात्र, श्रीगोंदासह नगर जिल्ह्यात असे किमान एक हजार रवी दळवी आहेत. ते पंटर आहेत. किरकोळ कमिशनवर ते काम करतात. या सार्‍यांचे मुखीया वेगळेच आहेत. त्यात ‘प्रताप’ अन् ‘विकी’ हे दोघे जगजाहीर आहेत. त्यांना हात लावण्याची हिंमत पोलिसांची आहे का, असा सवाल जाहीरपणे उपस्थित केला जात आहे.

तुकाराम मुंडे यांच्यासमोर नगरमधील गुटखा तस्करीतील
‘प्रताप’ अन् ‘विकी’ कनेक्शन!
आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अवैध गुटखा विक्री अन् तस्करीच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतलीय. त्याचे राज्यातून स्वागत होत असताना नगर जिल्ह्यात आजही ही तस्करी आणि विक्री जोरात असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील या तस्करीचे म्होरके म्हणून प्रताप अन् विकी या जोडगिळीची नावे जाहीरपणे चर्चेत आहेत. या दोघांना आणि त्यांच्या गुटखा तस्करीला अटकाव करण्याची हिंमत पोलिसात नाही. श्रीगोंद्यात तर जप्त केलेला गुटखा किरण शिंदे या अधिकार्‍याने प्रतापी दबावातून सोडून दिला. सोडून दिलेला हा गुटखा दुसर्‍या दिवशी गुन्हे शाखेने पकडला. आता त्याचे सारे पुरावे समोर आले आहेत. अन्न व भेसळ विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यात लक्ष घातले तर मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. नगरमधील ही तस्करी राजाश्रीत असल्याने पोलिस त्या विरोधात फारसे काहीच करु शकत नसल्याची चर्चा राजरोस घडत आहे.

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com