नीलेश लंके प्रतिष्ठान राबविणार उपक्रम : खा. लंके
पारनेर | नगर सह्याद्री
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही सोलापूर जिल्ह्यातील परीते येथे भव्य अन्नछत्र व आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 22 जुलै या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, चार दिवसांत सुमारे तीन ते चार लाख वारकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा सलग पाचव्या वष हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. विठ्ठलभक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत अन्नदानाबरोबरच आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा, नाश्ता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारीच्या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक त्या क्षणी मदत मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे लंके यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत परीते येथे 25 ते 30 डॉक्टरांचे पथक, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिका चारही दिवस कार्यरत राहणार आहेत. प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तातडीने उपचार केले जाणार असून, कोरोना काळात आरोग्य व्यवस्थापनाचा मिळालेला अनुभव या सेवेत उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण सेवायज्ञासाठी सुमारे 500 स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. यंदाच्या वारीतही सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश जपत लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटना सज्ज झाली असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नाशिक ते पंढरपूर दिंडी मार्गाचा प्रश्न अधिवेशनात
नाशिक ते पंढरपूर दिंडी मार्गाच्या उभारणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असून, 22जुलैपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा प्रभावीपणे मांडणार आहोत. दिंडी मार्गाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे खासदार लंके यांनी सांगितले.










