- जाहिरात -spot_img
breaking news

मुकुंदनगरमध्ये तरुणावर हल्ला; सासूला मारहाण करून दागिने लांबवले, कचरा टाकल्याने महिलेला शिवीगाळ…

फेरफटका मारण्यास मज्जाव करत तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
रात्रीच्या वेळी गल्लीतून फिरण्यास विरोध करत एका इसमाने सरकारी कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून गंभीर जखमी केल्याची घटना सिव्हील हडको परिसरात घडली. या हल्ल्यात फिर्यादी सुहास बाळासाहेब जगताप (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुहास जगताप हे छावणी परिषदेत सरकारी नोकरीस असून ते कुटुंबासह सावेडी येथील सिव्हील हडको भागात राहतात. २२ एप्रिल रोजी रात्री जेवण झाल्यावर ते समता चौकातून पायी फिरण्यासाठी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्याच गल्लीत राहणारा आरोपी लाभेश जवाहरलाल जंगेडिया याने जगताप यांना अडवले. “आमच्या घरासमोरून आणि गल्लीतून फिरायचे नाही,” असे म्हणत त्याने वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि लाभेशने हातातील लोखंडी रॉडने जगताप यांच्या डोक्यात जोरात वार केला.

​हल्ल्यात जगताप यांच्या कपाळावर गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला, तसेच हातालाही दुखापत झाली. आरडाओरडा ऐकून जगताप यांचे कुटुंबीय मदतीला धावले. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेथून वैद्यकीय मेमो घेऊन मॅक्सकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगताप यांच्या डोक्याला दोन ठिकाणी टाके पडले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी लाभेश जंगेडिया विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चांगदेव आंधळे करत आहेत.

कौटुंबिक वादातून सासूला मारहाण करून दागिने लांबवले; अहिल्यानगरमधील केडगाव परिसरातील घटना
​अहिल्यानगर: केडगाव परिसरातील भूषणनगर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेला तिच्याच नातेवाईकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या केडगाव येथील घरी असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी आरोपींनी फिर्यादीला जमिनीवर लोटून देत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या झटापटीत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि महागडा भ्रमणध्वनी संच जबरदस्तीने हिसकावून नेला. तसेच फिर्यादीच्या मुलाला देखील आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे.

​या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किंजल गांधी, निकीता सासवडकर, निखिल धंगेकर आणि एका अनोळखी महिलेवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  सभापती, उपसभापती उद्या पदभार घेणार; खासदार डॉ. नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती

भरदिवसा दागिने चोरी; गायत्री मंदिर हॉलमधील घटना
​अहिल्यानगर: शहरातील गजबजलेल्या महाजन गल्ली भागातील गायत्री मंदिर हॉलमध्ये एका घरगुती कार्यक्रमादरम्यान चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने ७२ वर्षीय महिलेचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंजली अशोक देशमुख (रा. पुणे) या १९ एप्रिल रोजी दुपारी अहिल्यानगरमधील गायत्री मंदिर हॉल येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दुपारी ३ ते ५ वाजेच्या सुमारास त्या हॉलमध्ये असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या कानातील ४० हजार ३१० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले अत्यंत शिताफीने चोरून नेली.
​आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरट्याचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप बडे हे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कचरा टाकल्याच्या वादातून निवृत्त महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: घरासमोरील पाण्याच्या टाकीजवळ कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून कोठी परिसरातील न्यू बेथेल कॉलनीमध्ये एका निवृत्त महिला कर्मचाऱ्यासह त्यांच्या पतीला बेदम शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या वादात मध्यस्थी करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या नणंदेला धक्काबुक्की करण्यात आल्याने त्या जखमी झाल्या असून, कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या असून त्या आपल्या कुटुंबासह कोठी परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या वंदना शिंदे या नेहमी पाण्याच्या टाकीजवळ कचरा टाकत असल्याने हा वाद उद्भवला. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास टाकीजवळ कचरा आणि मेलेली चिंचुद्री टाकल्याचे पाहून तक्रारदाराने तो उचलण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तक्रारदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तक्रारदाराचे पती तेथे आले असता, त्यांनी घरासमोर गाड्या लावण्यास मज्जाव केला.

​त्याचा अधिक राग धरून राजेंद्र शिंदे आणि कांचन साळवे यांनी “रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का?” असे म्हणून अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या नणंदेला वंदना शिंदे यांनी जोरात ढकलून दिले. या धक्काबुक्कीत त्या खाली पडल्याने त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वंदना शिंदे, राजेंद्र शिंदे, रिना मुक्तीकर, प्रशांत शिंदे, तारुण शिंदे आणि कांचन साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस फौजदार बनकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  मनपाचे राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यात सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल : डॉ.सुजय विखे

शासकीय कामात अडथळा आणून महिला मोटार वाहन निरीक्षकास धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामखेड रस्त्यावर कर्तव्य बजावत असलेल्या महिला मोटार वाहन निरीक्षकाचे शासकीय वाहन अडवून त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आयेशा अश्फाक हुसैन या वायु वेग पथक क्रमांक २ वर कार्यरत असताना ही घटना घडली. त्यांनी ओव्हरलोड असलेल्या एका सहा टायर ट्रकवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. सदर वाहन शासकीय कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपी संतोष भास्मा, अजिनाथ बेरड, धोंडीराम निक्रड आणि जगताप यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारने हुसेन यांचे वाहन अडवले.

​आरोपींनी हुसेन यांच्या ताब्यातील जप्त केलेले वाहन पळवून नेले आणि त्यांना ‘तू नोकरी कशी करते ते बघतो’ अशी धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुकुंदनगरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील मुकुंदनगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​साहिल मेहमुद देशमुख या २२ वर्षीय मजुरी करणाऱ्या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुकुंदनगरमधील मोठी मशीद परिसरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी साहिल आणि त्याचा भाऊ परिसरात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हे सुद्धा वाचा :  ... तर घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही; महिन्याला एकाच सिलेंडर, पहा सविस्तर

​यावेळी आरोपी सलीम अनिस शेख आणि जुनेद इनामदार यांनी आपल्याजवळील चाकूने साहिलच्या डाव्या खांद्यावर आणि बरगडीवर वार करून त्यास गंभीर जखमी केले. ‘आमच्यामध्ये पडलात तर तुम्हाला जिवंत मारून टाकू,’ अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ देखील जखमी झाला असून त्यांच्यावर पॅसिफिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​या घटनेप्रकरणी पोलिसांनी सलीम अनिस शेख, सना सलीम शेख (दोघे रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) आणि जुनेद इनामदार, राजू इनामदार (दोघे रा. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर या घटनेचा अधिक तपास करत असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त; तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई
​अहिल्यानगर: राज्यात विक्रीस बंदी असलेला सुगंधी पानमसाला, तंबाखू आणि आरोग्यास घातक असलेला मावा विक्री करणाऱ्यांविरोधात तोफखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथील एका जनरल स्टोअर्सवर छापा टाकून पोलिसांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
​अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किरण धन्यकुमार जगदाळे यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अझहर फारुख पठाण (वय २२, रा. सरकार चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील सरकार चौकात असलेल्या इम्रान जनरल स्टोअर्समध्ये मानवी शरीरास अपायकारक असलेल्या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार ६०० रुपये किमतीचे विमल पानमसाल्याचे २४ पाकीट, सुगंधित तंबाखू आणि १० किलो वजनाचा मावा असा एकूण १३ हजार १२८ रुपयांचा माल जप्त केला.
​हा सर्व साठा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे माहिती असूनही आरोपीने केवळ विक्रीच्या उद्देशाने आपल्या दुकानात बाळगल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशराम कोळपे करत आहेत. शहरातील प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री विरोधात पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ