- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरच्या उत्तर भागात निसर्गाचा कोप ; तुफान वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; बळीराजा पुरता कोलमडला

वासुंदे, पळशी, खडकवाडी भागात घरांचे पत्रे उडाले

बेभान वादळामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर; घरांवरील पत्रे अन् गोठ्यांची झाली पडझड!

पारनेरच्या उत्तर भागात निसर्गाचा कोप ; तुफान वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; बळीराजा पुरता कोलमडला

पारनेरमध्ये गारपिटीचा सलग दुसऱ्या आठवड्यात तडाखा; प्रशासन कधी जागे होणार?

​पारनेर/ नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात निसर्गाने थैमान घातले आहे. वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी आणि वडगाव सावताळ परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या बेभान वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरावरील पत्रे उडणे, विजेचे खांब कोलमडणे आणि शेती पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाने घाला घातला. वासुंदे परिसरातील बोकनकवाडी, शिक्री, खडकवाडीतील जांभळवाडी तसेच पळशीतील चिमणीबारव भागात वारे इतक्या वेगाने वाहत होते की बघता बघता उभ्या पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने कांदा, मिरची, झेंडू, टरबूज, डाळिंब, गहू आणि आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळ्यासाठी साठवून ठेवलेला ज्वारी आणि बाजरीचा वैरणीचा चारा पावसात भिजल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

वादळाचा वेग इतका भीषण होता की अनेक भागांत घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे कागदासारखे उडून गेले. वासुंदे येथील बबन बोरुडे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने त्यांचा पूर्ण संसार रस्त्यावर आला आहे. बन्सी गोवर्धन राठोड यांच्या घरावर झाड कोसळले, तर राजेंद्र शिरतार आणि विठ्ठल जेडगुले यांच्या घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पळशी येथील राघू सोमा मधे आणि बाबाजी किसन जाधव यांची घरे पडल्याने ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. खडकवाडीत राघू केदार, पोपट केदार, बुवाजी जाधव आणि शंकर केदार या गरीब शेतकऱ्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले असून एका किराणा दुकानालाही वादळाचा मोठा तडाखा बसला आहे.

हे सुद्धा वाचा :  ज्ञानेश्वर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले

आधुनिक शेतीसाठी बसवलेले सौर पॅनलही या गारपिटीतून सुटू शकले नाहीत. वासुंदे येथील माजी सरपंच रंगनाथ सैद, ताराबाई सैद आणि रामदास शिरतार यांच्या विहिरीवरील सौर पॅनल गारपिटीमुळे तुटले व उडून गेले आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाबळे वस्तीवर विजेच्या तारा तुटल्या असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिलीप भागाजी पाटोळे यांच्या जनावरांच्या गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. मारुती भालेकर यांच्या कंपाउंडमध्ये विजेचा पोल पडल्याने मोठी भीती निर्माण झाली होती. साहेबराव गुंजाळ यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात शेतीसोबतच मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व्यवसाय चालतो, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कच्च्या विटांचे पाणी झाले असून, वीट व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील २-३ दिवस पुन्हा अशाच पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून बाधितांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना नवीन घरे बांधून द्यावीत आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
​हवामान खात्याने पुढील २-३ दिवस पुन्हा अशाच पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना नवीन घरे बांधून द्यावीत आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी सरकारला दिली आहे.

प्रशासनाने आता कागदी घोडे नाचऊ नका!
निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. हाताशी आलेला कांदा, फळबागा आणि राहती घरेही गारपिटीने हिरावून नेली आहेत. प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे न नाचवता, तातडीने या भागाचे पंचनामे करून थेट आर्थिक मदत द्यावी, हीच आमची मागणी आहे; अन्यथा बळीराजा पूर्णपणे कोलमडून पडेल. अशी मागणीच माजी चेअरमन दिलीप पाटोळे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :  12 जुलैला श्री क्षेत्र पोखरीहून प्रस्थान...श्री रंगदास स्वामी महाराजांचा पालखी सोहळा

दोन दिवसांच्या वादळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. घरांचे पत्रे उडाले असून पावसाच्या भीतीमुळे रात्र जागून काढावी लागत आहे. सरकारने केवळ पिकांचीच नाही, तर ज्यांची घरे पडली आहेत आणि ज्यांचे सौर प्रकल्प फुटले आहेत, त्यांनाही विशेष नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा, ही विनंती आहे.
सचिन सैद (वासुंदे, शिक्री)

अळकुटी, म्हस्केवाडी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस
निघोज – बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी पाडळी आळे, म्हस्केवाडी, रेनवडी, अळकुटी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. शेतकर्‍यांसहीत सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्य जनतेला नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे यांनी केली.
सध्या बहुतांश ठिकाणी कांदा काढणी तसेच गहू कापणी सुरू असून या पावसाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हतबल केले आहे. पाडळी आळे, म्हस्केवाडी, रेनवडी,अळकुटी या परिसरात बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह पाऊस पडला आहे. या पावसाने कहर केला आहे. डाळिंब, केळी या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच सर्वसामान्य कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. एकतर शेतीमालाला भाव नाही, त्यातही या अवकाळी पावसाचे अस्मानी संकट आणि सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्य जनतेला नुकसान भरपाई देण्याची मागणी डॉ. शिरोळे यांनी केली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ