बासरी लॉजिंग प्रकरणात फेरतपासाचे न्यायालयाचे आदेश
तपासातील हलगजपणावर ताशेरे
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर येथील गाजलेल्या बासरी लॉजिंग बलात्कार प्रकरणात पोक्सो न्यायालयाने तपासातील त्रुटींवर गंभीर निरीक्षण नोंदवत फेरतपासाचे आदेश दिले आहेत.न्यायाधीश फड यांनी दिलेल्या आदेशानुसार
या प्रकरणातील तपासाची नव्याने चौकशी करून सविस्तर अहवाल न्यायालयास सादर करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीला खोटे सांगून व दबावाखाली पारनेर येथील बासरी लॉजिंगवर बोलावण्यात आले होते. त्यानंतर आरोपी तुषार चत्तर (रा. सिद्धेश्वरवाडी) याने तिच्यावर अत्याचार
केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून त्याचा जामीन अर्जही न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे.
दरम्यान, न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान तपासातील अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तपासी अधिकारी हंडाळ यांनी तपास करताना अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. त्यामुळे प्रकरणाचा फेरतपास करून बासरी लॉजिंगचे मालक व आरोपी यांच्यातील संपर्का संदर्भातील कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत तसेच आवश्यकतेनुसार संबंधितांची भूमिका निश्चित करून अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात त्यांच्यावर विविध स्तरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही लेखी अर्जाद्वारे तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या वतीने ॲड. शिर्के यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांच्या प्रयत्नांमुळे न्यायालयाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत फेरतपासाचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करून निश्चित मुदतीत अहवाल सादर करण्याचे निर्देशही पोलिस प्रशासनाला दिले आहेत
. दरम्यान, आरोपीकडून यापूर्वीही काही मुलींना त्रास दिल्याचे आरोप स्थानिक स्तरावर चर्चेत असून, अशा प्रकारची माहिती असलेल्या पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.तथापि, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिस प्रशासन फेरतपास कशा पद्धतीने करते आणि प्रकरणातील सर्व संबंधित बाबींचा उलगडा होतो का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.










