अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. काशिनाथ दाते, आ.अमोल खताळ आदी उपस्थित होते. तर अपक्ष म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, भाजपचे माजी नगरसेवक कमलेश हस्तीमल गांधी, मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ यांनी अर्ज दाखल केले आहेत.
विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. जिल्ह्यात भाजप नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जागेवर भाजपने दावा केला होता. याबाबत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत जागावाटप होऊन ही जागा भाजपच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना या जागेवरून पक्षाने उमेदवारी जाहीर केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महायुतीकडून भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी आशिया यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे आमदार खताळ, राष्ट्रवादीचे आ. दाते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तनपुरे यांनी सर्व पक्षातील नेत्यांसोबत माझे वैयक्तिक संबंध असल्याचे सांगत त्याचा निवडणुकीत फायदा होणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यापूव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्व.अरुणकाका जगताप यांनी सलग दोन टर्म विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असून, आ.संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी उमेदवारी लढण्याची घोषणा करून उमेदवारी अर्ज नेला होता. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शेवटपर्यंंत चर्चा होती. मात्र, महायुतीचा धर्म पाळत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत कोण कोण उमेदवार उमेदवारी अर्ज माघारी घेतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत…; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, पहा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजपकडून 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवारांची नावंही जवळपास निश्चित झाले आहेत.
भाजपच्या 11 उमेदवारांची यादी-
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी-
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी-
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे
आधीचे आमदार कोण?-
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)










