पारनेर | नगर सह्याद्री
हरियाणा राज्यातील रोहतक येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुयातील शिरापूर येथील पैलवान निलेश उचाळे याने ८२ किलो वजनगटात देशात तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदकाची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
निलेश उचाळे हा गुरुकुल कुस्ती संकुल, भाळवणी येथे एन.आय.एस. कुस्तीपंच पै. गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.त्याचबरोबर तो सध्या सीताई कला व विज्ञान महाविद्यालय, कुरकुंडी ता. संगमनेर येथे पदवी शिक्षण घेत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन याच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राला अभिमानास्पद यश मिळवून दिले.पै. निलेश उचाळेच्या या यशाबद्दल कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी तसेच महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
गाव, जिल्हा आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणार्या निलेशकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात भारताचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा उंचावावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.










