महापौर ज्योतीताई गाडे यांनी सभा तहकूब; २७ मार्च रोजी सविस्तर चर्चा / घरपट्टी-पाणीपट्टी कपातीसह लोकाभिमुख बदलांची शिफारस
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या वतीने आज महासभेत महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे १७३८ कोटींचे अंदाजपत्रक सभापती सुभाष लोंढे यांनी सादर केले. यावेळी महापौरांनी सभा तहकूब करत २७ मार्च रोजी अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती दिली.
या प्रसंगी आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ऍड. धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त गजेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहर लहारे तसेच स्थायी समिती सदस्य व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती सुभाष लोंढे म्हणाले की, घरपट्टी व पाणीपट्टीचा ठराव रद्द करून जुन्या दरानुसार आकारणी करावी. महापालिकेचे सध्याचे बजेट फुगीर असल्याची टीकाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश यांना वंदन करून तसेच या शहराला लाभलेल्या संत, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा स्मरून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून मी सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकावर माझे मनोगत व्यक्त करीत आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापौर ज्योतीताई गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांच्या सहकार्याने हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. आयुक्तांनी १७१० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने नागरिकांच्या गरजेनुसार सुधारणा करून त्यात बदल सुचवले असून तो अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. लोंढे यांनी सांगितले की, मालमत्ता हस्तांतरण फी, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, मालमत्ता नोंदणी शुल्क, गुंठेवारी विकास, शाळा भाडे, रस्ता फोडणे-जोडणे, अतिरिक्त चटई क्षेत्र व पाणी मीटरद्वारे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
मालमत्ता रिव्हिजनमध्ये खाजगी संस्थांकडून झालेल्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून भाडेकरू दरानुसार आकारलेली घरपट्टी रद्द करून मनपाच्या मूळ दरानुसार आकारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच पाणीपट्टीमध्ये २७ टक्के कपात करण्याचाही प्रस्ताव आहे.
कल्याण रोड परिसरात वाढत्या वस्त्यांमुळे पाणीटंचाई लक्षात घेता विद्यानगर व कल्याण रोड येथे नवीन पाण्याची टाकी उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नेहरू मार्केट, रंगभुवन व प्रोफेसर कॉलनी येथे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे नियोजन आहे.
शहरात ई-बस सेवा सुरू करण्यासाठी ४० बसेस चालविण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात १० बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बाबर मळा ते लोखंडी पूल या दरम्यान काम सुरू होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५०४ घरकुलांचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. असे ते म्हणाले










