खडकवाडी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
पारनेर | नगर सह्याद्री
वनकुटे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कमी दाबाच्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात गुरुवारी खडकवाडी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. विजेअभावी शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन छेडले.
आंदोलनादरम्यान टोमॅटो पीक जळाल्याने व्यथित झालेल्या राजेंद्र इरोळे या शेतकऱ्याने विजेच्या पोलवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनकुटेसाठी स्वतंत्र फिडर देण्याचे लेखी आश्वासन महावितरणकडून मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.वनकुटे व परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असून दर काही मिनिटांनी वीज खंडित होत आहे. त्यामुळे कृषी पंप बंद पडत असून पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने टोमॅटो, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी एकत्र येत खडकवाडी वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनादरम्यान राजेंद्र इरोळे यांनी त्यांच्या शेतातील टोमॅटो पीक जळाल्याची व्यथा मांडत संतापाच्या भरात विजेच्या पोलवर चढून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढत त्यांना खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. यावेळी आंदोलकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठ्याबाबत विचारणा केली असता केवळ बिघाड झाला आहे, असे सांगितले जाते; मात्र तो दुरुस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेवर बिले भरण्याची अपेक्षा करणाऱ्या महावितरणने दर्जेदार वीजपुरवठा करण्याची जबाबदारीही पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली.
माजी सरपंच ॲड. राहुल झावरे यांनी आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वनकुटेतील वीज समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गारपीट व अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी मिळालेल्या निधीचा योग्य वापर झाला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आंदोलनाची तीव्रता वाढत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी वनकुटे गावासाठी स्वतंत्र फिडर उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच त्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात ॲड. राहुल झावरे, दीपक गुंजाळ, शिवाजी बरकडे, पांडुरंग बेलकर, राजेंद्र इरोळे, अनिल काकडे, राहुल गुंजाळ, चिवा औटी, तात्या मुसळे, शरद आग्रे, सोमनाथ मुसळे, राजू डहाळे, देविदास वाबळे, सनी इरोळे, किरण शिंदे, चेतन गुंजाळ, संकेत वाळुंज, संकेत शिंदे, राजेंद्र शिंदे, अनिल शिंदे, किरण शिंगटे, पवन इरोळे, अजित गुंजाळ, सतीश वाबळे, संदीप इरोळे, संदीप शिंदे, भिवा बरकडे, अजित वाळुंज, नितीन गुंजाळ, विजय वाबळे, नवनाथ शिंदे, संतोष डोके, आकाश झावरे, दादा वाळुंज यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
..तर अधिक तीव्र आंदोलन
अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी हमीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत झाली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, शेतकरी, कुटुंबीय व जनावरांसह महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.










