- जाहिरात -spot_img
breaking news

खंडणी.. अंगठी.. सव्वा लाख पळविले.., तरुणावर जीवघेणा हल्ला कुठे काय घडलं पहा

प्रकल्प संचालकांकडे मागितली दरमहा ५० हजारांची खंडणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अमरीश माणिकराव मानकर यांना कार्यालयात घुसून धमकावत दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात किरण शिवाजी राऊत, संदीप भास्कर भगत आणि अ‍ॅड. हर्षद चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमरीश मानकर हे मार्केटयार्ड येथील मएनएचएआयफ कार्यालयात प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर ते मनमाड रस्ते विकासाचे काम सुरू आहे. ६ एप्रिल रोजी किरण राऊत, संदीप भगत आणि हर्षद चावला हे विनापरवाना कार्यालयात घुसले. तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, जर काम करायचे असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्यांनी मानकर यांना दिली. त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुन्हा राऊत आणि भगत कार्यालयात आले आणि पैशांची विचारणा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तसेच किरण  राऊत याने फोनवरून कंत्राटदारांची बिले न काढण्याची धमकी दिली होती. आरोपींनी महामार्गावर काम करणार्‍या इंजिनिअर व कामगारांचे विनाकारण फोटो काढून त्यांना त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून मानकर यांनी कायदेशीर तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पॅराडाईझ सोडा पॉइंटसमोरून सव्वा लाखाची रोकड लंपास
नगरमध्ये चारचाकी गाडीतून भरदिवसा चोरी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील मिस्किन मळा परिसरात असलेल्या पॅराडाईझ सोडा पॉईंटसमोरून चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी रोहन बाबासाहेब शिरसाठ यांच्या चारचाकी गाडीतून दोन अनोळखी इसमांनी चक्क १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाईपलाईन रोडवरील शिरसाठ मळा येथील रहिवासी रोहन शिरसाठ हे ७ एप्रिल रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मिस्किन मळा परिसरात गेले होते. त्यांनी आपली चारचाकी गाडी पॅराडाईझ सोडा पॉईंटसमोर उभी केली होती. गाडीच्या पुढच्या सीटच्या मध्ये त्यांनी पैशांची पिशवी ठेवली होती. हीच संधी साधून दोन अनोळखी चोरट्यांनी लबाडीच्या उद्देशाने शिरसाठ यांच्या संमतीशिवाय ती पिशवी चोरून नेली.

हे सुद्धा वाचा :  ऑगस्टअखेर पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यास प्राधान्य द्या; मंत्री विखे पाटील यांनी काय दिले निर्देश पहा

पिशवीमध्ये विविध दरांच्या नोटा असलेली एकूण सव्वा लाखाची रोकड होती. चोरी झाल्याचे लक्षात येताच  शिरसाठ यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव आणि पोलीस उपनिरीक्षक योगेश चहाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.सध्या या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार बारगजे आणि खंडागळे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत.

कामगारानेच लांबविली सोन्याची अंगठी
अहिल्यानगर: घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे एका महिलेला महागात पडले आहे. कॅमेरे बसवण्याचे काम करणार्‍या कामगारानेच घरातील टेबलावर ठेवलेली सोन्याची अंगठी चोरल्याची घटना केडगाव येथील शिवाजीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी सुनंदा श्रीहरी अधापुरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सतीश रेसवाल (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) या संशयित कामगारावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या आपल्या मुलासह केडगाव परिसरात राहतात. घराच्या बाहेर सीसीटीव्ही बसवण्यासाठी त्यांनी एका कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानुसार सतीश रेसवाल हा कामगार त्यांच्या घरी पाच दिवसांपासून काम करत होता. कामादरम्यान घरात धूळ उडत असल्याने फिर्यादी यांनी आपली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हॉलमधील एका बरणीत काढून ठेवली होती. काम आटोपून रेसवाल निघून गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी फिर्यादी यांनी पाहिले असता, त्यांना बरणीतील अंगठी दिसून आली नाही. घरात इतर कोणत्याही व्यक्तीचे येणे-जाणे नसल्याने आणि संशयिताचा मोबाईल क्रमांकही बंद असल्याने त्यानेच ही चोरी केल्याची खात्री फिर्यादीला पटली. पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याची नोंद केली आहे.

तरुणावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर: शहरातील प्रेमदान हाडको भागातील एका सलून दुकानात केस कापण्यासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या वादातून चौघांनी कोयता आणि वस्तर्‍याने खुनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यश मनोज कांडेकर हा तरुण आपल्या मित्रासह घोणसे लासजवळील बंटी सलूनमध्ये बसलेला असताना ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा :  फसव्या कर्जमाफीविरोधात शासन निर्णयाची होळी....

आरोपी अमोल पाडळे, तुषार भोसले, नयन तांदळे आणि अक्षय पवार हे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. आमच्या भागात हवा करायची नाही, नीट राहायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत आरोपींनी यशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून घेतली. अमोल पाडळे आणि तुषार भोसले यांनी हातातील कोयत्याने यशच्या छातीवर व पाठीवर वार केले, तर नयन तांदळे याने सलूनमधील वस्तर्‍याने त्याच्या डोयावर आणि हातावर गंभीर इजा केली. हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात कोयता नाचवून दहशत निर्माण केली आणि पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळसूत्र पळविले
अहिल्यानगर: शहरातील गजबजलेल्या न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन येथे एका कार्यक्रमादरम्यान वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगला रामदास गायकवाड (वय ६१, रा. दिल्लीगेट परिसर) या नंदनवन लॉन येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. सायंकाळी आरती आटोपल्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगला गायकवाड यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने ओरबाडून नेले. सुमारे २१ ग्रॅम वजनाचे हे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ