पारनेर / नगर सह्याद्री –
मानवी जीवितास धोकादायक ठरू शकणाऱ्या अवैध हातभट्टीच्या दारू निर्मितीविरोधात पारनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पळसपूर (ता. पारनेर) गावच्या शिवारात ओढ्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १ लाख ६४ हजार ५०० रुपये किमतीचे कच्चे रसायन आणि तयार दारू जप्त केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी वसंत बाबाजी आहेर याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि त्यांचे पथक टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्र हद्दीत गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. पळसपूर येथील केशव आनंत गुंजाळ यांच्या घराजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे कच्चे रसायन वापरून गावठी दारू गाळत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाई दरम्यान पोलिसांना २,२०० लिटर कच्चे रसायन (किंमत १ लाख ५४ हजार रुपये) आणि १०५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू (किंमत १० हजार ५०० रुपये) असा एकूण १,६४,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून वसंत बाबाजी आहेर (वय ३३) याला ताब्यात घेतले, तर गोकुळ बाबाजी आहेर, गोरक्ष पांडुरंग पोपळघट आणि ‘भाईक’ नावाचा एक इसम अशा चौघांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २४७, २७५, ३(५) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सपोनि नितीन खंडागळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










