नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरणार पहिला संघ ठरला. भारताने दिलेले २५६ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना किवी संघाचा डाव १५९ धावांत आटोपला. या विजयासह भारतीय संघ स्वतःचे जेतेपद यशस्वीरीत्या राखणारा (Defend) जगातील पहिला संघ ठरला आहे, तसेच घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणाराही भारत पहिलाच यजमान देश बनला आहे.

२०२३ च्या जखमांवर विजयाची फुंकर
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे शल्य प्रत्येक भारतीयाच्या मनात होते. त्यामुळे ८ मार्च रोजी जेव्हा भारत पुन्हा एकदा अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा चाहत्यांच्या मनात धाकधूक होती. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने भूतकाळ विसरून नव्या जिद्दीने खेळत इतिहास रचला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने ९८ धावांची वादळी सलामी दिली.

संजू-अभिषेकने पहिल्या विकेटसाठी साकारली ऐतिहासिक भागीदारी –
अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२ धावांचे वेगवान अर्धशतक ठोकले, तर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर इशान किशनने देखील २५ चेंडूत ५४ धावा कुटत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात बाद झाला असला, तरी अखेरच्या षटकांत शिवम दुबेने अवघ्या ८ चेंडूत २६ धावा चोपल्या, तर हार्दिक पांड्याने १८ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला, जी टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
न्यूझीलंडचा निम्मा संघ ७२ धावांतच तंबूत परतला –
प्रत्युत्तरात २५६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली विखुरला गेला. टिम सायफर्ट आणि फिन अॅलन यांनी ३१ धावांची सलामी दिली, परंतु पहिला गडी बाद झाल्यानंतर किवी संघाची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली. केवळ ७२ धावांवर त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होते. न्यूझीलंडकडून टिम सायफर्टने सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सँटनरने ४३ धावांचे योगदान दिले, मात्र इतर सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत रोखला.
बुमराह-अक्षरची भेदक गोलंदाजी –
भारताच्या या ऐतिहासिक विजयात जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली, तर अक्षर पटेलने ३ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. अशा प्रकारे, फलंदाजांच्या विक्रमी धावसंख्येमुळे आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे भारताने ९६ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.

‘हे’ पाच खेळाडू ठरले ‘विजयाचे शिल्पकार’
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. हा विजय मिळवून दैदीप्यमान कामगिरी करत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाचे श्रेय सर्वच खेळाडूंचे असले तरी विजयाचे शिल्पकार पाच खेळाडू ठरले आहेत. ज्यांच्यामुळे भारतीय संघ विजयी ठरला आहे. जाणून घेऊयात त्या पाच खेळांडूविषयी…
१ संजू सॅमसन
सेमी फायमन आणि फायनल सामन्यात संजू सॅमसनची कामगिरी लक्षवेधून घेणारी ठरली आहे. या खेळाडूने सर्वांचे मनं जिंकली आहेत. केरळचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन भारतासाठी अत्यंत महत्वाची कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सर्व सामन्यांमध्ये अर्थशतके ठोकली आहेत. सॅमसनने फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर नाबाद ९७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ८९ धावांची खेळी त्याने केली. तो या स्पर्धेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असून, त्याची ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
२ जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला जिंकून देण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी करत बळी घेतल्याने विजयाची वाटचाल आणखी सोपी झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या कोट्यातील चार षटकांत १५ धावा देत ४ बळी घेतले. तो या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. त्याने ८ सामन्यात १४ बळी घेतली आहेत.
३ ईशान किशन
ईशान किशन याने भारतीय संघासाठी ३ अर्धशतके झळकावली. फायनल सामन्यात त्याची कामगिरीत कौतुकास्पद ठरली. केवळ २१ चेंडूत त्याने ५२ धावा केल्या. यावेळी त्याचा २४७.६१ इतका स्ट्राइक रेट होता. या सामन्यात किशनने संजू सॅमसनसोबत ४८ चेंडूंमध्ये १०५ धावांची भागीदारी केली. ईशानने नामिबियाविरुद्धही अर्धशतक केले. त्याने ९ सामन्यांत ३१७ धावा केल्या. तो भारताचा दुसरा सगळ्यात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला आहे.
४ हार्दिक पंड्या
या स्पर्धेत हार्दिक पंड्याने देखील आपला उत्तम खेळ दाखवला. त्याचे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीकडे योगदान आहे. त्याने ९ सामन्यात एक अर्धशतक ठोकत २१७ धावा केल्या. इतकंच नाही, तर पंड्याने ९ विकेट्सही घेतल्या. त्याची इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील फलदांजी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
५ शिवम दुबे
अंतिम सामन्यात शिवम दुबेने कमाल केली. टीम इंडियाने १५ षटकांत २०३ धावसंख्या केली. संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव हे खेळाडू बाद झाल्यानंतर अशा परिस्थितीत शिवम दुबेने जिमी नीशमच्या षटकात दोन षटकार आणि ३ चौकार मारले. त्याने ८ चेंडूंतील २६ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ २५५ धावा पूर्ण करु शकला. त्याने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात २५ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली होती.










