माहिती अधिकार कायद्यातील बदलांविरोधात अण्णा हजारे आक्रमक
राळेगणसिद्धी येथील ऐतिहासिक यादव बाबा मंदिरात करणार उपोषण
सुपा / नगर सह्याद्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य सरकारने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नुकत्याच लागू केलेल्या नव्या जाचक नियमांविरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली असून, हे नियम मागे न घेतल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने १३ जून रोजी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काही नवीन निकष आणि नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हे धोरण माहितीचा अधिकार कमकुवत करणारे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे असल्याचा घणाघाती आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अण्णा हजारे यांनी पत्राद्वारे सरकारच्या नव्या नियमावलीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेली भरमसाठ शुल्क वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. अर्जदारासाठी ओळखपत्राची सक्ती केल्यामुळे माहिती मागवण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होणार आहेत. सर्वात आक्षेपार्ह ठरणारी ‘एक विषय-एक अर्ज’ ही अट माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी आहे, असे अण्णांचे म्हणणे आहे.
माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीला बळकटी देणारा आणि प्रशासनात पारदर्शकता आणणारा कायदा आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला हा अधिकार हिरावून घेण्याचा किंवा तो कमकुवत करण्याचा हा छुपा प्रयत्न असल्याचा दावा अण्णांनी केला आहे. प्रशासनातील पारदर्शकता संपवण्याचा घाट घातला जात असल्याने अण्णांनी सरकारला इशारा दिला आहे.
जर सरकारने यावर तातडीने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथील ऐतिहासिक यादव बाबा मंदिरात अण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. आता अण्णांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार नमते घेणार की, कायदा लढाई अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










