- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी विद्यापीठातील मजूराची हत्या; देहऱ्यात राडा, ध्वनी प्रदूषण भोवले दोघांवर गुन्हा, काय काय घडलं पहा

राहुरी | नगर सह्याद्री-
राहुरी- शनिशिंगणापूर रोडलगत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात कंत्राटी मजूर म्हणून काम करणाऱ्या 27 वषय तरुणाची अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे (वय 27, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) असे आहे.

श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घरून कामासाठी कार्यालयात आला होता.

दरम्यान, त्याच ठिकाणी कार्यरत असलेले दुसरे कंत्राटी मजूर बंडू बर्डे हे रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर आले असता श्रीकांत दोंदे हा नेहमीच्या ठिकाणी त्याचे अंथरून असलेल्या ठिकाणी दिसून न आल्याने त्यांनी परिसरात बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला. यावेळी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत दोंदे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली. त्यानंतर राहुरी पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, परिसरातील हालचाली तसेच इतर विविध अंगांनी तपास सुरू आहे.

मृत श्रीकांत दोंदे याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे घटनेमुळे गोटुंबे आखाडा व राहुरी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

एमआयडीसी परिसरातून लाखो रुपयांचे कॅमेरे लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनीतून अज्ञात चोरट्याने खोलीचा उघडा दरवाजा पाहून आत प्रवेश केला आणि तब्बल 3 लाख 2 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये महागडा व्हिडिओ कॅमेरा, रोख रक्कम आणि पाच महागडे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव संभाजी खराडे हा तरुण व्यवसायनिमित्त चेतना कॉलनी परिसरात राहतो. घटनेच्या दिवशी गौरव आणि त्याचे मित्र खोलीमध्ये झोपलेले होते. खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेला दीड लाख रुपये किमतीचा महागडा कॅमेरा, लेन्स, कॅमेरा स्टँड आणि मेमरी कार्ड चोरले. 2 हजार रुपयांची रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच महागडे मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

हे सुद्धा वाचा :  गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; सहा पोलीस जखमी, वाहनाचे नुकसान

देहऱ्यात राडा
अहिल्यानगर -देहरे गावात पूर्ववैमनस्यातून एका 59 वषय व्यक्तीवर लोखंडी कोयता, लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक शिवराम जाधव हे गावातील स्वस्त धान्य दुकानासमोर उभे असताना आरोपींनी त्यांना विनाकारण गाठले. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना घेराव घातला. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी लाथाबुक्क्‌‍यांनी आणि सोबत आणलेल्या घातक शस्त्रांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहिता पोलीस ठाण्यात
अहिल्यानगर : फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्न झाल्यापासून नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सासरी नांदत असताना पती, सासू आणि चार नणंदांनी संगनमत करून तिला वेळोवेळी विनाकारण शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करून उपाशी पोटी ठेवले. सासरच्या मंडळींनी पैशांची मागणी लावून धरत विवाहितेचा अत्यंत क्रूरपणे छळ केला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला घरातून हाकलून देण्यात आले.या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने माहेर गाठले आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार छळ आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.

ध्वनी प्रदूषण; डीजे मालक, अध्यक्षावर गुन्हा
अहिल्यानगर : शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत एका जयंती उत्सव मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मिरवणूक मार्गावर हा प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भिस्तबाग चौक येथील पार्वती कॉर्नर समोरून ही मिरवणूक जात होती. मिरवणुकीमध्ये आरोपींनी डीजे सिस्टीम लावून अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी संबंधितांना आवाजाची मर्यादा कमी करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मात्र, आरोपींनी या शासकीय सूचनांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनी मोठ्या आवाजात गाणी सुरूच ठेवून घोषणाबाजी देखील केली. पोलीस कॉन्स्टेबल सुजय विल्यम हिवाळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष दादा बंडू नाबदे आणि डीजे मालक प्रवीण बबन भोंडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  मला माफ करा, मला एक संधी द्या…! ३७० रुपयांची बिर्याणी’ वादावर प्रणित मोरे यांची जाहीर माफी

दिवसाढवळ्या घरफोडी; दागिने, रोकड लंपास
अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोळनेर येथे एका बंद घराचे कुलूप खोलून अज्ञात चोरट्याने 71 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात नवनाथ मारुती साळुके (वय 37, रा. अकोळनेर, ता. जि. अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ साळुके हे त्यांचे घर बंद करून गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप उघडले आणि आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील 50 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, 18 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची कानातील कर्णफुले आणि 2 हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरला. तसेच घरात ठेवलेली 1 हजार रुपयांची रोकड, ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटा होत्या, ती देखील चोरट्याने लंपास केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ