पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातील दशक्रिया विधी घाट शेड बांधकाम व सुशोभीकरणासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन पार पडले असताना, त्याच जागेवर काही व्यक्तींनी पूर्वग्रहदूषित व खोडसाळ हेतूने अवैधरित्या शेड उभारण्याचे काम सुरू केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत वॉर्ड क्रमांक 5 मध्ये दशक्रिया घाट शेड व सुशोभीकरणासाठी 30 लाख रुपयांचे काम मंजूर झाले असून संबंधित कामाचे भूमिपूजनही विधिवत पार पडले आहे. मात्र, त्याच ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना शेड उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराला विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा शेड उभारणीला विरोध नसून, मंजूर विकासकामाच्या जागेवर अतिक्रमण करून ते उभारण्यास त्यांचा आक्षेप आहे.याबाबत नगरपंचायत प्रशासनात विरोधी बाकावर बसणारे नगरसेवक अशोक फुलाजी चेडे, शालुबाई कांतीलाल ठाणगे,पै. युवराज पठारे, ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, नवनाथ तुकाराम सोबले, निताताई देवराम ठुबे यांसह राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राजू दत्तात्रय औटी आणि राष्ट्रवादीचे उपशहरप्रमुख सुनील अरुण गाडगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या अर्जात त्यांनी दशक्रिया घाटावरील सुरू असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याची मागणी करत, संबंधित शेड दुसऱ्या योग्य जागेवर उभारण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
दशक्रिया घाटावर शेड उभारण्यास आमचा कोणताही विरोध नाही, मात्र शासनाकडून मंजूर झालेल्या 30 लाख रुपयांच्या विकासकामाच्या जागेवर अतिक्रमण करून काम करणे योग्य नाही. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात अडथळा निर्माण होणार असेल तर त्याची दखल घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. आम्ही नगरपंचायत प्रशासनाकडे केवळ नियोजित जागेचे संरक्षण व्हावे आणि मंजूर काम सुरळीतपणे पूर्ण व्हावे, अशीच मागणी केली आहे. नागरिकांच्या हिताच्या विकासकामांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा.
-अशोक चेडे, नगरसेवक










