अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होईना
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक 332 मधील शासकीय गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणांमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज व्यवस्था आणि सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र सुभाष झेंडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गट क्रमांक 332 मधील सुमारे एक एकर शासकीय गायरान जमिनीवर एका माजी सैनिकाने पक्के तार कंपाऊंड व पत्र्याचे शेड उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपाऊंडच्या आत गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन पाण्याच्या टाक्या, वीज वितरणासाठी असलेली डीपी तसेच नागरिकांच्या वापरातील मुख्य सार्वजनिक रस्ता अडकल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कंपाऊंडला गेट लावून कुलूप ठोकण्यात आल्यामुळे पाण्याच्या टाक्यांची देखभाल, दुरुस्ती आणि पाणीपुरवठा व्यवस्थापनात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच डीपीपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने वीजपुरवठ्याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक रस्ता बंद झाल्याने शाळकरी विदयार्थी, महिला आणि शेतकऱ्यांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रकरणी मच्छिंद्र झेंडे यांनी पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. मात्र आदेशानंतरही महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही पिण्याचे पाणी, वीज आणि रस्त्याचा प्रश्न सुटत नसेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार मच्छिंद्र झेंडे यांनी दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी गट क्रमांक 332 मधील कथित बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवून सार्वजनिक रस्ता, पाण्याच्या टाक्या आणि वीज यंत्रणेसाठी मुक्त प्रवेश उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लवकरच अतिक्रमण काढणार
ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे, त्यास ग्रामपंचायतीने तीन नोटिसा पाठविल्या आहेत, मात्र या नोटिसीला कसले ही उत्तर दिले नाही. गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी ही पोलिस संरक्षणात अतिक्रमणात काढण्याचे आदेश दिले आहेत परंतु ग्रामसेवक मीना काळे यांनी पोलीस संरक्षण मागण्यासाठी अर्जावर सही केलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण काढणे स्थगित राहिले आहे. ग्रामसेवक सुद्धा आमचे ऐकत नाहीत.अतिक्रमण केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत पण लवकरच अतिक्रमण काढणार असल्याचे सरपंच कुलदीप कदम यांनी सांगितले.










