५९ हजार ४८ प्रकरणे निकाली तर ५७ कोटी ७२ लाख रुपयांची वसुली
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या लोकअदालतीत एकूण ५९ हजार ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ५७ कोटी ७२ लाख ३९ हजार ४३१ इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या सर्व लोकअदालतींपैकी ही सर्वाधिक यशस्वी लोकअदालत ठरल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच संपन्न झाली.
या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटल्याची (चेक बाऊन्स) प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक वाद, महावितरणाशी संबंधित समझोता प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसातील समझोत्यासाठी ठेवण्यात आली होती. जिल्ह्यातील ५६ हजार ७५४ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली, तर २ हजार २९४ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. विशेष मोहिमेमध्ये १ हजार २२८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीनिमित्त जिल्हा न्यायालय परिसर रांगोळी व फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. न्यायाधीश, विधिज्ञ, बँका व पतसंस्था, विमा कंपन्या, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलिस, विधी स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी तसेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने लोकअदालत यशस्वीरीत्या पार पडली.










