मुंबई / नगर सह्याद्री –
अखेर केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. केरळमधील मान्सूनचे आगमन भारताच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाल्याने महाराष्ट्रातही त्याचे आगमन उशिराच होईल, असा अंदाज आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून महाराष्ट्रात पुढील २ दिवसात दाखल होईल. ६ ते ७ तारखेच्या आसपास मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अन् नंतर संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार आहे. त्यामुळे विदर्भात सध्या होणाऱ्या पावसामुळे हवेत तात्पुरता गारवा निर्माण होणार असला, तरी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना खऱ्या मान्सूनसाठी १५ जून उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पुढील ४८ तासांत कोकणात पाऊस धडकणार
यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाले असून, अखेर मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये सामान्यतः १ जून रोजी येणारा मान्सून यंदा तीन दिवस उशिराने आला असला, तरी सध्या पुढील प्रवासासाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्रासह कोकण भागात पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
१० जूनपर्यंत उष्णतेची लाट
कोकणात पाऊस दाखल होत असला, तरी विदर्भातील नागरिकांना मान्सूनसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. विदर्भात साधारणतः १५ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. सध्या विदर्भातील तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या घरात असून, १० जूननंतरच तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. मान्सूनसाठी आवश्यक असणारे अनुकूल वातावरण विदर्भात निर्माण होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.










