रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा रास्ता रोको
सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांनी ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा दि. 16 जुलै रोजी प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून महामार्गावर पुतळा दहन व तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा अंतिम इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन शेळके यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार पारनेर आणि पोलीस निरीक्षक सुपा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नारायणगव्हाण परिसरातील महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने रस्त्यावर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपूर्ण काम, धुळीचे साम्राज्य, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे दररोज अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांत जवळपास दररोज एक ते दोन अपघात घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. अनेक युवक गंभीर जखमी झाले असून काहींना हात-पाय गमवावे लागले आहेत. शालेय विद्याथ, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी यापूव अनेक वेळा निवेदने देऊन, पाठपुरावा करून तसेच आंदोलने करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित भूधारकांना योग्य मोबदला देऊन प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने या अंतिम पूर्वसूचनेची गंभीर दखल घेऊन तत्काळ काम सुरू न केल्यास 16 जुलै रोजी संपूर्ण नारायणगव्हाण ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, महिला व नागरिक लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढतील, पुतळा दहन करतील आणि नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.










