श्रीगोंदा पोलिसांवर संशयाची सुई, वरिष्ठांकडून दखल
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेलाच लाखो रुपयांचा गुटखा पुन्हा विक्रीसाठी बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने श्रीगोंदा पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नूतन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा परिसरात छापा टाकून 26 लाख 40 हजार 296 रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि वाहने जप्त केली होती. त्यानंतर हा मुद्देमाल व गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
मात्र, काही दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथे पुन्हा कारवाई केली असता, जप्त करण्यात आलेल्या पोत्यांवर आधीच्या गुन्ह्याचे क्रमांक आढळून आले. यानंतर या प्रकरणाची सखोल पडताळणी करण्यात आली असता, जप्त केलेला मुद्देमाल पुन्हा विक्रीसाठी बाहेर काढल्याचा संशय निर्माण झाला.
या संदर्भातील प्राथमिक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, तसेच त्यांना सहआरोपी करण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.










