शिर्डी | नगर सह्याद्री –
साईबाबांच्या समाधीवर चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता बसल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर शिर्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या समाधी स्थळावर झालेल्या या प्रकारामुळे भाविकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून शिर्डीत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे साई संस्थानच्या परवानगी प्रक्रियेवर, वरिष्ठ अधिकार्यांच्या भूमिकेवर आणि धार्मिक स्थळांवरील चित्रीकरणाच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रद्धेची नगरी समजल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डीत सध्या साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘तेरे साई’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात साईबाबांची भूमिका अभिनेता संजय मिश्रा साकारत आहेत. चित्रीकरणादरम्यान तो थेट साईबाबांच्या समाधीवर बसल्याचे दृश्य समोर आल्यानंतर ग्रामस्थ, साईभक्त आणि विविध साई संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अनेकांनी या प्रकाराला श्रद्धेचा अवमान असे संबोधत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. साईबाबांची समाधी ही देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. परंपरेनुसार समाधीवर पुजार्यांखेरीज इतर कोणालाही बसण्याची परवानगी नसते. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोणत्या अटींवर परवानगी देण्यात आली, समाधीवर अभिनेत्याला बसवण्यास विशेष परवानगी होती का, धार्मिक भावना लक्षात घेऊन आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले होते का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे हा प्रकार साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असल्याने त्यांना मंदिरात उपस्थित असलेल्या भालदार चोपदार यांनी रोखले नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. केवळ चित्रीकरण पथक नव्हे तर संस्थान प्रशासनाची जबाबदारीही चर्चेत आली आहे. साईंच्या समाधीची पवित्रता जपण्यात प्रशासन अपयशी ठरले का? असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि प्रशासकीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. वाद वाढल्यानंतर साईबाबा संस्थान प्रशासनाकडून हा प्रकार नकळत घडला असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कैलासबापू कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, बांधकाम सभापती अरविंद कोते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, विजय जगताप, अनिताताई जगताप, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक निलेश कोते, नितीन कोते, रवींद्र गोंदकर, अमित शेळके, सुधीर शिंदे, सतीश गोंदकर, किरण कोते, ताराचंद कोते, वसंत गोंदकर व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान चित्रपटातील समाधीवरील संबंधित दृश्य तात्काळ हटवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. मात्र भाविकांचा रोष अद्याप कायम असून केवळ दृश्य हटवणे पुरेसे नाही तर जबाबदारांवर ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. साईनगरीत घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा धार्मिक स्थळांवरील व्यावसायिक चित्रीकरणाच्या मर्यादा, पवित्र स्थळांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि श्रद्धेच्या प्रश्नांकडे पाहण्याची प्रशासनाची भूमिका यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. साईंच्या समाधीची पवित्रता नेमके कोण जपणार असा एकच प्रश्न सध्या शिर्डीत विचारला जात आहे. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी या झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.










