पारनेर बाजार समितीत 15 हजार गोण्यांची आवक
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या पडझडीमुळे हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवार, 27 मे रोजी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या गावरान कांद्याला प्रति किलो 17 ते 18 रुपये म्हणजेच 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. या लिलावात बाजार समितीच्या आवारात सुमारे 14 हजार 130 कांदा गोण्यांची मोठी आवक झाली होती, अशी माहिती बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर आणि उपसभापती संदीप सालके यांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारात कांद्याला अपेक्षित आणि योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे बाजार समितीमध्ये माल विक्रीला न आणता अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, बुधवारी कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारात दर्जेदार कांद्याची मागणी वाढल्याने घसरलेले भाव पुन्हा थोडे वधारले आहेत. या बाजारभाव सुधारणेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी लिलावातील वेगवेगळ्या प्रतीच्या कांदा दराची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, बुधवारच्या लिलावात सर्वोत्तम दर्जाच्या 199 गोणी कांद्याला 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च भाव मिळाला. याखालोखाल 1 नंबर दर्जाच्या कांद्याला 1500 ते 1600 रुपये भाव मिळाला, तर 2 नंबर दर्जाचा कांदा 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. बाजारात 3 नंबरच्या कांद्याला 800 ते 1100 रुपये आणि सर्वात खालच्या म्हणजेच 4 नंबरच्या हलक्या प्रतीच्या कांद्याला 200 ते 700 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पारनेर बाजार समितीच्या आवारात रविवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस कांदा लिलाव अधिकृतपणे सुरू ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सभापती गंगाराम बेलकर व उपसभापती संदीप सालके यांनी दिली. अनेकदा मध्यस्थ किंवा व्यापारी थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांची अडवणूक करण्याची किंवा कमी भावात माल खरेदी करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली कोणतीही आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी आपला कांदा शेतावर न विकता थेट बाजार समितीत आणूनच त्याची विक्री करावी, असे आवाहन पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.










