अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मोक्का कायद्यासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून अकोलेतील दरोड्यासह जिल्ह्यातील एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईत आणखी सात साथीदार आणि चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याचा आरोप असलेला एक संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे अशोक केरू वाळुंज यांच्या घरात चार अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या पथकाने तांत्रिक विलेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. 14 जुलै रोजी मुख्य आरोपी अजय सादीश काळे (रा. वाळुंज) हा वाळकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला आणि त्याचा साथीदार अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले (रा. घानेगाव, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत दोघांनी अकोलेतील दरोडा हा आणखी सात साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने किरण बेंद्रे याला विकल्याची माहितीही समोर आली. या प्रकरणातील सात आरोपी आणि चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याचा संशय असलेला एक जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मुख्य आरोपी अजय काळे याच्यावर सुपा, पारनेर, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, चाकण आणि इतर पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि मोका कायद्यांतर्गत एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय उर्फ सोन्या भोसले याच्याविरुद्धही पारनेर व चाकण येथे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून अकोले, नगर तालुका, पारनेर, आश्वी, राहाता, लोणी आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
केस मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर: शहरातील धरती चौक परिसरातील महाराणी गल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाने दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी एका महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. ही घटना मंगळवारी, 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिला आपल्या घरी असताना आरोपी विकार शाबीर सय्यद याने तिच्या घरात प्रवेश केला. त्याने पीडितेच्या भावाने पोलीस ठाण्यात दिलेली केस मागे घेण्याचा तगादा लावला. महिलेने या गोष्टीला नकार दिला असता आरोपीने संतापून तिला अलील भाषेत शिवीगाळ केली. जर केस मागे घेतली नाही तर तुला आणि तुझ्या भावाला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
हुंड्यासाठी छळ
अहिल्यानगर – जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे हुंड्यासाठी एका 20 वषय विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला उपाशी ठेवून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरातून हाकलून दिले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेचे लग्न राहुरी येथील तरुणाशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नात सोन्याची अंगठी का दिली नाही, असा जाब विचारत पतीने तिला उपाशी पोटी ठेवले. तसेच वडिलांकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, तरच तुला नांदवणार अशी धमकी सासरच्यांकडून सतत देण्यात येत होती.या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने भरोसा सेलकडे दाद मागितली होती.










