- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, भरदिवसा टोळक्याचा राडा, तरुणावर चाकूहल्ला कुठे काय घडलं पहा

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | चार आरोपी ताब्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर तालुक्यातील मदडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले असून तीन जण फरार झाले आहेत. आरोपींकडून तलवार, सत्तुर, कटावणी, मिरची पावडर आणि मोबाईल असा सुमारे ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हे रोखण्यासाठी विशेष पेट्रोलिंग सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व त्यांच्या पथकाने १० मार्च रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत ६ ते ७ जण दोन मोटारसायकलवरून येऊन मदडगाव शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला.

तेव्हा अंधारात काही संशयित इसम हातात हत्यारे घेऊन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकत चार जणांना ताब्यात घेतले, तर इतर काही आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये छगन चिंतामण काळे (वय ४३, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि. बीड), महावीर पंढरीनाथ भोसले (वय ३९, रा. शेरी खु., ता. आष्टी, जि. बीड), कदम चिंचावन काळे (वय ३५, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि. बीड) आणि इदगर गारमन चव्हाण (वय ३८, रा. शेरी खु., ता. आष्टी, जि. बीड)   यांचा समावेश आहे.फरार आरोपींमध्ये प्रविण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले (दोघे रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) आणि संतोष उर्फ सिंधुशा सूर्यभान काळे (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.पोलिसांनी आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी कटावणी, सत्तुर, तलवार, मिरची पावडर आणि तीन मोबाईल असा एकूण ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपींपैकी छगन चिंतामण काळे याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये दरोडा, घरफोडी व गंभीर गुन्ह्यांचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदर आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सुनिल मालणकर यांच्या पथकाने केली.

भरदिवसा टोळक्याचा राडा
मायलेकावर कोयत्याने हल्ला करून दागिने लुटले
अहिल्यानगर – थकीत कर्ज असलेल्या गाड्या ओढून आणल्याच्या रागातून एका टोळक्याने बाफना ज्वेलर्ससमोर मायलेकावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत मुलाच्या डोयावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, तर महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स पळवून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साबीरअली मन्सुरअली सय्यद यांचा वाहने जप्त करण्याचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी सुनील जितसिंग जुन्नी याची दुचाकी बँकेने जप्त करून सय्यद यांच्या ताब्यात लावली होती. याचाच राग मनात धरून सुनील जुन्नी, शंकर पंडित, सतनाम सिंग, कुणाल सिंग, रोहित पंडित आणि एका अनोळखी इसमाने नगर-मनमाड रस्त्यावर हा हल्ला चढवला. बाफना ज्वेलर्समधून सोने खरेदी करून बाहेर पडलेल्या फिर्यादीच्या मुलाला आणि पत्नीला आरोपींनी वाटेत गाठले. तुला जास्त माज आला आहे का, आमच्या गाड्या ओढून नेतो का? असे म्हणत सुनील जुन्नी याने कोयत्याने वार केला, ज्यामध्ये मुलाला १५ टाके पडले आहेत.

हे सुद्धा वाचा :  ‌‘प्रति पिताश्री‌’च्या पेहरावात ‌‘अक्षय‌’चे विधिमंडळात पाऊल; पायरीवर डोके ठेवून...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही लाकडी दांडयाने मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या जवळील ८८ हजार ४२८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोकड आणि आधारकार्ड असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

विहिरीच्या पाणीउपशावरून नेप्तीमध्ये तुंबळ हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर – सामायिक विहिरीचे पाणी उपसण्याच्या कारणावरून नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. विहिरीवर पाणी उपसण्यास मज्जाव करत आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबाला दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल अण्णा राऊत हे आपल्या घरासमोर असताना आरोपी संजय केर राऊत, स्वराज संजय राऊत आणि वैशाली संजय राऊत यांनी त्यांना विहिरीचे पाणी उपसण्यावरून हटकले. तू आमच्या विहिरीचे पाणी उपसायचे नाही आणि विहिरीवर यायचे नाही, असे म्हणत आरोपींनी वाद घातला. ही आपली सामायिक विहीर असून त्यावर आमचाही हक्क आहे, असे फिर्यादीने सांगताच आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. संजय राऊत आणि वैशाली राऊत यांनी हातातील दगड आणि काठीने विशाल यांना जबर मारहाण केली. त्याच वेळी स्वराज राऊत याने फिर्यादीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला आणि आई-वडिलांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपमानित केले. पुन्हा विहिरीवर आलात तर कुर्‍हाडीने तुकडे करून टाकू, अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस हवालदार जंबे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळला
अशोक लेलँड टेम्पोसह ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर – शहरातील हातमपुरा चौक परिसरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक उधळून लावली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश सुभाष पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, अशोक लेलंड कंपनीच्या दोस्त टेम्पोमधील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कुठे घडला प्रकार पहा

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संशयास्पद टेम्पो ( एम.एच. १६, सी.डी. ४८८९) अडवण्यात आला. या वाहनाची झडती घेतली असता, त्यात अत्यंत क्रूरपणे पाय बांधलेल्या अवस्थेत गोवंशीय जनावरे मिळून आली. यामध्ये एक पांढर्‍या रंगाची गावरान गाय आणि दोन कालवडींचा समावेश आहे. कत्तलीच्या उद्देशाने या जनावरांची कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि ५५ हजार रुपयांची जनावरे असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार साबीर शेख व बोरगे पुढील तपास करत आहेत.

चांदबीबी महालाजवळ तरुणावर चाकूहल्ला
अहिल्यानगर: शहरातील ऐतिहासिक चांदबीबी महाल परिसरात एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुना मोबाईल परत मागितल्याच्या कारणावरून चिडलेल्या आरोपीने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दत्तात्रय अशोक शिंदे (वय २०, मूळ रा. बीड, सध्या रा. बोल्हेगाव) हा तरुण अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबीबी महाल सर्कलजवळ उभा होता. यावेळी त्याने आरोपी संकेत पालवे (रा. मेहकरी, अहिल्यानगर) याला आपला मोबाईल परत मागितला. मोबाईल मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने जवळ असलेला चाकू काढून दत्तात्रयच्या पोटावर वार केला.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी आरोपी संकेत पालवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोखंडे करत आहेत.

आदर्शनगरमध्ये चोरी; सोन्याचे दागिने लंपास
अहिल्यानगर : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आदर्श नगर परिसरात एका अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

फिर्यादी राजस दीपक पंचमुख (वय ६०, रा. आदर्श नगर, अहिल्यानगर) या त्यांच्या घरात असताना ६ मार्चच्या रात्री १० ते ७ मार्चच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, आर्थिक फायद्याच्या उद्देशाने डबीत ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र लंपास केले. या घटनेची माहिती १० मार्च रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि सहाय्यक पोलीस फौजदार राकेश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी राजस पंचमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस फौजदार राकेश खेडकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  डॉ. वर्धमान कांकरिया ठरले जगातील अव्वल नेत्रतज्ज्ञ; आंतरराष्ट्रीय सन्मान; पहिल्या 50 नेत्रतज्ज्ञांत वर्णी

भरदिवसा घरफोडी
अहिल्यानगर: शहरातील भवानीनगर भागात दिवसाढवळ्या घरफोडीची धाडसी घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रुती शरद गुगळे (वय ३५) या दि. १० जानेवारी रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. सकाळी १०:३० ते दुपारी १२:५० या अल्प कालावधीत चोरट्याने संधी साधली. अज्ञात चोरट्याने सुखसागर निवासस्थानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे आणि रोख १८ हजार रुपये असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा माल लंपास केला.या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल भुगडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. फिर्यादीने मंगळवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जुन्या वादातून प्राणघातक हल्ला
अहिल्यानगर: भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराबाभळी परिसरात जुन्या वादातून एका हॉटेल व्यावसायिकावर आणि त्यांच्या चुलत भावावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन एकनाथ माने (वय ३५) हे हॉटेल व्यावसायिक असून ते आपल्या चुलत भावासोबत शाहपूरकडून भिंगारच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बाराबाभळी गावाजवळील पुलावर आरोपी आदिनाथ मारुती माने आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन ते तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि काचेच्या बाटलीने नितीन यांच्या डोयावर आणि हातापायांवर जबर प्रहार केले. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी मारहाण करतानाच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. बी. अकोलकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ