- जाहिरात -spot_img
breaking news

देवाभाऊ, बापट अन्‌‍ अण्णांचा तालुका कुठं नेऊन ठेवलाय?

खा. लंके समर्थक जितेश सरडेने स्वत: सहभागी होत केला गुंडांच्या टोळीचा वापर | पाच गावठी कट्टे अन्‌‍ मॅगझिनचा वापर
इनसाईड स्टोरी / शिवाजी शिर्के
राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या खास मजतील सभापती प्रा. राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील विखे पाटलांच्या विरोधकांची मोट बांधत आहेत. याच जिल्हा बँक निवडणुकीत पारनेरमधून खा. निलेश लंके यांना सोबत घेत असतानाच लंके समर्थकांची मोठी गुन्हेगारीची धक्कादायक घटना घडली आहे. पारनेरमधून जिल्हा बँकेसाठी खा. लंके हे उमेदवारी करणार असून त्यांच्या बाजूने वि. का. सोसायट्यांचे जास्तीत जास्त ठराव होण्यासाठी ते स्वत: पहाटेपर्यंत गावोगाव फिरले. रुई छत्रपती गावचा ठराव आपल्याच बाजूने व्हावा यासाठी मोठी फिल्डींग लावत त्याची जबाबदारी जितेश सरडे यांच्यावर सोपविण्यात आली. सोसायटीचे संचालक शिडकडून नगरच्या दिशेने येत असल्याची माहिती जितेश सरडे याला मिळाली. त्याने या कामगिरीसाठी आधीच प्रवीण रसाळ याला सोबत घेतले होते. रसाळ अन्‌‍ सरडे व त्यांचे सहकारी देहऱ्याच्या पुलावर थांबून राहिले. माहिती मिळालेली संचालकांची गाडी समोर दिसताच तिला अडविण्यात आले. चालकाचे दोन्ही हात, दोन्ही पाय फ्रॅक्चर करण्यात आले. गाडीत अन्य तिघे संचालक असल्याचे समजून त्यांनाही बेदम मारहाण केली. पिस्तुलाचा धाक दाखवला गेला. जखमी चालकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी जोरदार चक्रे फिरवली. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासाची चक्रे फिरवली अन्‌‍ सरडे- रसाळ या प्रमुखांसह त्यांची टोळीच अटकेत टाकली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असल्याने गुन्हे शाखेने अटक केलेले आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडेच आता पुढील तपास होणार आहे.

प्रवीण रसाळ गँगला खा. लंके यांचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट!
बाजार समितीचे माजी उपसभापती व निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याकांडात प्रवीण रसाळ व त्याची गँग मुख्य आरोपी होती. प्रवीण रसाळ व त्याचे काही सहकारी सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. संदीप वराळ यांची हत्या झाल्यानंतर याच प्रवीण रसाळ टोळीच्या विरोधात निलेश लंके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख असताना लंके यांनी आवाज उठवला होता. काळ बदलला आणि लंके आमदार आणि नंतर खासदार झाले. वराळ हत्याकांडातील प्रवीण रसाळ जामिनावर बाहेर आला अन्‌‍ खा. लंके यांच्या संपर्कात आला. आठ- दहा वर्षापूव गुंड म्हणून ज्याला हिणवले, तोच प्रवीण रसाळ खा. लंके यांना अचानक देव कसा वाटू लागला? रुई छत्रपती गावच्या सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने व्हावा यासाठी प्रवीण रसाळ, त्याचा भाऊ अन्‌‍ त्याच्या टोळीला जितेश सरडे याने संपर्क केला की लंके यांनी रसाळ याला संपर्क केला याचा तपास आता पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  सावेडीत राडा, ११२ ला खोटी माहिती देणे भोवले, मायलेकावर हल्ला, CCTV वरून वाद....

‌‘त्या‌’ घटनेचा अन्‌‍ दरोड्याचा टोळीचा जितेश सरडेच मुख्य सूत्रधार!
खा. निलेश लंके यांचा उजवा हात म्हणून ओळख राहिलेल्या जितेश सरडे याला खा. लंके यांनी मोठे पाठबळ दिले. त्यातून त्याच्याकडे सर्व प्रकारची सुबत्ता देखील आली. दरोड्याच्या टोळीत त्याचा मुख्य सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. देहरे पुलावर घडलेल्या घटनेचा मास्टरमाईंड जितेश सरडे हाच होता आणि त्याच्याच सांगण्यानुसार आम्ही हे कृत्य केले असल्याची कबुली अन्य आरोपींनी दिल्याने खा. लंके समर्थकांबाबत केल्या जाणाऱ्या टिकेला पुष्टीच मिळाल्याचे मानले जाते.

विशाल पवार याने काय म्हटलेय फिर्यादीत?
विशाल संपत पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार पांढरे रंगाची स्कॉर्पिओ गाडीमधुन त्यांचे दोन मित्र असे शिड येथुन दर्शन करुन देहरे शिवारातील रेल्वे ब्रिजवरुन येत असतांना दोन चारचाकी वाहनांनी फिर्यादीचे गाडीला गाडी आडवी लावुन गाडीतुन 07 ते 08 इसम उतरुन त्यांचे हातात असलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. संभा लोणकर, सुबाष गाढवे व संजु लोणकर यांना मारहाण करुन त्यांना त्यांचे गाडीमध्ये बळजबरीने बसवुन घेवुन गेले. फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु. र. नं. 540/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(3),118(2), 324(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पवार साहेब, तुमच्या आयटी सेलचा राज्याचा प्रमुख की गावठी कट्टे बहाद्दर!
दरोड्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींकडून या घटनेचा मुख्य सुत्रधार जितेश सरडे हाच असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्याथ काँग्रेस माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचा राज्याचा प्रमुख म्हणून जितेश सरडे हा काम करतो. देवीभोयरे हे त्याचे गाव. खा. निलेश लंके यांचे बरेचसे व्यवहार आणि जबाबदाऱ्या सरडे हाच सांभाळतो. त्याची मोठी आर्थिक उलाढाल असल्याचे लपून राहिलेले नाही.

पिंट्या अन्‌‍ बंट्याने तोंड उघडले अन्‌‍
जितेश सरडे, रसाळ गँग समोर आली!
घटनेत सहभाग असणारा आरोपी शेंडी बायपास येथे पिंटु उर्फ भाऊ आनंदा रसाळ रा. रसाळवाडी निघोज ता. पारनेर व बंटी उर्फ स्वप्निल बिभिषण पाबळे रा. कावळ पिंपरी ता. जुन्नर जि.पुणे हे गावठी कट्ट्यासह मिळुन आले. त्यांना विश्वासात घेवुन नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी देहरे गावचे शिवारातील रेल्वे ब्रिजवर आमचे समोर चाललेल्या स्कॉर्पिओस आमचेकडील दोन वाहने आडवी लावुन त्यातील चालक व इतर इसमांना मारहाण करुन गाडीचे नुकसान करुन त्यांना बळजबरीने गाडीमध्ये बसवुन घेवुन वेगवेगळ्या ठिकाणी सोडुन दिले असुन सदर गुन्हा करते वेळी आम्ही तसेच इतर 07 ते 09 जणांनी मिळुन केला असुन ते सध्या चास गावचे शिवारात येणार असल्याची माहिती दिली. पोलिस पथकाने चास गावचे शिवारात जावुन सापळा लावुन थांबले असता तेथे संशयीतरित्या उभे असलेले दिसुन आले. त्यामध्ये भाऊसाहेब रामचंद्र लंघे वय-31 वर्षे रा. संविदने ता.शिरुर जि.पुणे, हर्षद मनोज थोरात वय- 29 वर्षे रा. लोणी धामणी, ता.आंबेगाव जि पुणे, जावेद किन्नर काळे वय- 20 वर्षे रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर, मिनीनाथ पोपटराव वाघस्कर वय-35 वर्षे रा.जामखेड रोड, निंबोडी ता.जि. अहिल्यानगर,जितेश सुरेश सरडे वय- 30 वर्षे रा.देवीभोयरे ता. पारनेर, हे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांचा प्रसाद मिळताच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्हा करतेवेळी सचिन धोंडीभाऊ रसाळ रा.रसाळवाडी निघोज ता. पारनेर (फरार), ऋषिकेश उर्फ भैय्या सुभाष भोसले रा.वरुड रोड वैष्णवनगर धाराशिव जि.धाराशिव (फरार), समाधान भांबरे रा.मोरवाडी निघोज ता. पारनेर(फरार), राजेंद्र रमेश सोडे रा.गणेशपुरी वारजे माळवाडी जि.पुणे(फरार), व प्रविण आनंदा रसाळ रा.रसाळवाडी निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर हल्ली रा. पिंपरी चिंचवड पुणे (फरार) हेही सहभागी होते अशी कुबली त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा :  महामार्ग दिशादर्शक फलकावरील जुनी नावे तात्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

जितेश सरडेसह त्याच्या टोळीकडे सापडले पाच गावठी कट्टे!
राज्याच्या आयटी सेलची जबाबदारी असणाऱ्या जितेश सरडेकडे तब्बल पाच गावठी कट्टे सापडल्याने त्याचा खरा चेहरा समोर आला असल्याचे मानले जाते. वक्तृत्व चांगले असल्याने त्याने अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. चांगले विचार व्याख्यानातून मांडणाऱ्या सरडेची दुसरी गुन्हेगारी बाजू समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

आता वडझिरेवर पोलिसांचा वॉच!
जितेश सरडे याच्या बाबत माहिती आता पोलिस संकलीत करु लागले असतानाच खा. लंके यांच्याशी संबंधीत वडझिरे येथील एका कार्यकर्त्याचे नाव देखील समोर आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यकर्त्याबाबत आधीच तक्रारी प्राप्त असून त्याची कुंडली जुळताच त्याच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे सांगितले गेले.

दरोड्याच्या त्या घटनेतील पडद्यामागे काय घडले?
रुई छत्रपती (पारनेर) येथील सोसायटीचा जिल्हा बँक निवडणुकीसाठी ठराव होणार होता. त्यासाठी सहलीवर गेलेले काही संचालक शिडहून नगरमार्गे गावी निघाले होते. राहुरी सोडल्यानंतर त्यांनी सोसायटीचे संचालकांची गाडी बदलली. एक गाडी पुढे, त्यामागे काही अंतरावर दुसरी गाडी, त्या मागे काही अंतरावर तिसरी गाडी असा ताफा होता. देहऱ्याच्या पुलावर आल्यावर काही जणांनी ती गाडी अडवली. त्यागाडीत सोसायटीचे संचालक आहेत, असे त्यांना वाटले. मात्र, गाडीत गावकरी होते. त्यांनी त्यातील लोकांना खाली उतरुन बेदम मारहाण केली. चालकाला बदेम चोप दिला. त्यात त्याचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात मोडून टाकले. गाडीतील तिघांना त्यांनी त्यांच्या गाडीत बसवले. काही अंतरावर गेल्यावर त्यांना समजले की यातील हे तिघेही संचालक नाहीत. त्यानंतर या तिघांना वेगवेगळ्या अंतरावर रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर मागून आलेल्या दुसऱ्या गाडीतील लोकांनी रस्त्याच्या बाजूला तोडफोड झालेली गाडी आणि बेदम मारहाण झालेला गाडीचा चालक पाहिला. त्यांनी ही माहिती राहुल शिंदे व पंकज कारखिले यांना दिली. त्यानंतर ज्या गाडीत संचालक होते, ती गाडी पाठीमागे शिडकडे वळविण्यात आली. यानंतर राहुल शिंदे यांनी गाडीचा चालक असणाऱ्या विशाल पवार याला विळद घाटातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ