आमदार काशीनाथ दाते व सुजित झावरे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; भाविकांची मोठी गर्दी
पारनेर | नगर सह्याद्री
प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री राही-रुमिणी देवस्थान, पळशी येथे आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्त पारनेर तालुयाचे आमदार काशीेनाथ दाते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-राही रुमिणीची महापूजा करून तालुक्यातील तसेच राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवस्थानात श्री विठ्ठल व राही-रुमिणी मातेला अभ्यंगस्नान घालून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर हरिनामाचा गजर, भजन, या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मिठू जाधव, सुमन दाते, सविता झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, अमोल साळवे, सरपंच प्रकाश राठोड, डॉ. बाबासाहेब ढोकळे, विकास रोकडे, संतोष जाधव, स्वप्निल झावरे, इंजि. प्रसाद झावरे, कर्ण रोकडे, राजेंद्र रोकडे, संतोष बोरुडे यांच्यासह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने अन्य भाविक उपस्थित होते.
पळशी येथील श्री राही-रुमिणी देवस्थान हे पारनेर तालुयातील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून या क्षेत्रआची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे. या देवस्थानाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास व्हावा, यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत आहे. जातेगाव व देवी भोयरेप्रमाणेच पळशी देवस्थानालाही ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सभामंडप उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे आणि बळीराजाच्या शेतात भरघोस पीक यावे, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना आहे.
– काशीनाथ दाते (आमदार, पारनेर-नगर)
श्री क्षेत्र विठ्ठल-राही रुमिणी देवस्थान हे पळशी गावाच्या धार्मिक वैभवाचे प्रतीक असून या क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देवस्थानाचा पर्यटन विकास आराखडा लवकरच मंजूर होईल, असा विश्वास आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर येथे भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण होतील आणि परिसराच्या विकासालाही चालना मिळेल. देवस्थान परिसरात दिवाळीपर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा प्रशस्त सभामंडप उभारण्यासाठी निधी मंजूर करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. धार्मिक परंपरा जपत विकासकामांनाही गती देणे हे आमचे ध्येय आहे. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सर्व भाविकांच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी श्री विठ्ठल-राही रुमिणी चरणी प्रार्थना करतो.
– सुजित झावरे (मा. उपाध्यक्ष जिल्हा परिषद)










