- जाहिरात -spot_img
breaking news

सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचा एल्गार; आता विजय औटींच्या घरासमोर उपोषण

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील हजारो गोरगरीब शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या ठेवी हडप करणार्‍या सेनापती बापट मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरोधात आता ठेवीदारांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने, या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावी आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी गुरुवारी २३ एप्रिल रोजी सेनापती बापटचे संस्थापक माजी आमदार विजय औटी यांच्या निवासस्थानासमोर पारनेर बाजार तळावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सविस्तर निवेदन पाठवून परवानगीची मागणी करण्यात आली आहे.

सेनापती बापट मल्टिस्टेट सोसायटीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६३/२०२५ अन्वये महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. संस्थेच्या २९ शाखांमधून शेकडो कोटींच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. मात्र, ठेवींची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने सर्वसामान्य ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ज्येष्ठांच्या औषधोपचाराचा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून, ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीन फेटाळले असतानाही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, मुख्य आरोपी फरार असून उच्च न्यायालयात तपास यंत्रणेने योग्य बाजू न मांडल्यामुळे काही आरोपींना जामीन मिळाला आहे.

हे आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना पोलीस मात्र हतबल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कारवाईची गरज आहे. ठेवीदारांनी मागणी केली आहे की, या संस्थेचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून आर्थिक अफरातफरीची नेमकी रक्कम समोर येईल. तसेच, संस्थेच्या आणि सर्व माजी व विद्यमान संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांची देणी अदा करावीत.या आंदोलनाद्वारे राज्य शासनाच्या गृह विभागाकडे संस्थेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत होणारे हे उपोषण शांततामय आणि सनदशीर मार्गाने केले जाणार असून, जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिला आहे. या लढ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा :  उन्हाळी आवर्तनच्या कालावधीत कुकडी कालवा परिसरात निर्बंध... काय कारण

विधानसभा उपाध्यक्ष व तीन वेळा आमदार राहिलेले विजय औटी हे सेनापती बापट पतसंस्थेचे संस्थापक आहेत. विजय औटी हे ठेवीदारांना ठेवी देण्याची जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांनी २०१७ मध्ये राजीनामा दिला असला तरी नैतिक जबाबदारी त्यांचीच आहे. ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी विजय औटी यांनीच नेतृत्व करायला पाहिजे होते.
– विनोद गोळे, अध्यक्ष शिवराय सामाजिक प्रतिष्ठान

औटींच्या विरोधात ठेवीदारांची आक्रमक भूमिका
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याच संस्थेने आज गरिबांना रस्त्यावर आणले आहे. शेकडो कोटींचा घोटाळा होऊनही संस्थापक विजय औटी मूग गिळून गप्प का आहेत? केवळ गुन्हे दाखल होऊन उपयोग नाही, तर आमच्या कष्टाचा एक-एक पैसा परत मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. सत्ता आणि पदाचा वापर करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास जनता त्यांना धडा शिकवेल, असे मत ठेवीदार व्यक्त करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ