राळेगणमध्ये राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद, महामंडळ सभा
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्कार व जीवन जगण्यासाठीची कला मिळत आहे. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार अनेक प्राथमिक शाळांचे भवितव्य अंधकारमय आहे. त्यामुळे गावागावांतील जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर गावचे गावपण, संस्कार व संस्कृती टिकणार असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
राळेगणसिद्धी येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य शिक्षण हक्क परिषद व राज्यस्तरीय महामंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्यासह राज्य संघाचे उपनेते रावसाहेब रोहोकले, राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, राजेश हिवाळे, बाळकृष्ण तांबारे, मच्छिंद्रनाथ मोरे, किशन इदगे, सचिन डिंबळे, स्वाती शिंदे, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, संजय शेळके, रामराव निकम, रावसाहेब सुंबे, बळवंत पाटील, राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, शिक्षक बँक संचालक सूर्यकांत काळे, तालुका नेते सुनील दुधाडे, तालुकाध्यक्ष युवराज हिलाळ, मंडळ तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, रघुनाथ झावरे आदी पदाधिकारी व शिक्षक सभासद उपस्थित होते.
पद्मश्री पवार म्हणाले की, शिक्षकांच्या शासन पातळीवरील टीईटी, संचमान्यता, पदोन्नती, बीएलओ कामे, ऑनलाइन कामे या प्रलंबित प्रश्नांसाठी व न्यायलढ्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिक पोलिस अकादमीतील 90 टक्के मुले प्राथमिक शाळेतील विदयार्थी होते, तर मसुरी येथील आयएएस अकादमीतही प्राथमिक शाळेतील विदयार्थी होते. त्यामुळे प्राथमिक शाळा संस्कार व जीवन जगण्याची कला देत आहेत. अण्णा हजारेंची शाळा ही नापासांची शाळा आहे. त्यामुळे माजी सैनिक व ग्रामविकासात आदर्श काम अण्णांनी उभे केले आहे.
संंघशक्ती हीच परिवर्तनाची नांदी ठरणार
आजच्या यशस्वी महामंडळ सभेमुळे राज्यात आपल्या प्रश्नांना न्याय फक्त शिक्षक संघच देऊ शकतो, याची खात्री प्रत्येकास आली. एवढ्या मोठया सभागृहात जागा पुरली नाही, मांडी घालून दाटीवाटीत बसावे लागले, ही खंत आहे. आजची संघशक्ती हीच परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
-प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ
..तर शिक्षक दिन आक्रोशाने साजरा
सरकारी शाळा वाचली पाहिजे. शेणामातीत हात घालणाऱ्या शेतकरी व गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत. त्यामुळे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आमच्यावर राज्य न्यायालयाचे आहे की राज्य सरकारचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. टीईटी व पदोन्नतीचे प्रश्न जर न्यायालयात असतील तर भविष्य अंधकारमय आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईसाठी नवे-जुने शिक्षक मिळून 11 ते 13 लोकांची कायदेशीर टीम बनविण्यात येणार आहे. जुनी पेन्शनबाबत सरकारने संवेदनशील राहिले पाहिजे. शिक्षण दिनापर्यंत प्रश्न सुटले नाहीत तर शिक्षक दिन आक्रोशाने साजरा करतील.
– बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, शिक्षक संघ
राज्याचा शिक्षण विभाग बंद पाडणार
एक वर्षात शिक्षक पदोन्नतीचा प्रश्न माग लावण्यासाठी काम करणार आहे. प्रश्न न सुटल्यास राज्याचा शालेय शिक्षण विभाग बंद पाडू, असा इशारा संभाजीराव थोरात यांनी दिला.यापुढील काळात सर्वोच्च न्यायालयात दिल्लीपर्यंत धडक देणार आहोत. टीईटीला आम्ही घाबरत नाही, परंतु इतर अधिकाऱ्यांना परीक्षा नाही का? शिक्षक रस्त्यावर उतरला तर राज्यकर्त्यांना राज्य करता आले नाही पाहिजे. त्यामुळे मागून काही मिळाले नाही तर हिसकावून घ्यावे लागते. यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे हीच एकजूट भविष्यकाळात विविध प्रश्नांवर कायम दाखवावी.
– संभाजी थोरात, राज्य नेते










