पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपी ताब्यात
पारनेर / नगर सह्याद्री :
सुपा एमआयडीसी परिसरात कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून सिलॉन बेव्हेरेज कॅन प्रा.लि.च्या एच.आर. हेड यांना मारहाण व लुटमार करणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर याच्या सूत्रधारतेने ही घटना घडली असून, पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात दहशत माजवणाऱ्या गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आरोपी वैभव रामदास रिकामे हा निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश मोहन भालेकर याच्या सांगण्यावरून कंपनीचे एच.आर. हेड महाडीक यांच्याकडे गेला होता. मात्र, कॉन्ट्रॅक्ट देण्यास नकार मिळाल्याने आरोपींच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. या रागातून सतीश मोहन भालेकर याच्या नियोजित कटाप्रमाणे वैभव रिकामे, अविनाश बोरकर, बादल आडे आणि चार विधीसंघर्षित बालकांनी मिळून महाडीक यांना रुईछत्रपती फाटा येथे अडवले. आरोपींनी त्यांना जबर मारहाण केली आणि सुपा एमआयडीसीत पुन्हा कामावर न येण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत आरोपी पसार झाले. याप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आतापर्यंत वैभव रिकामे याला अटक करून दोन विधीसंघर्षित बालकांना बालन्यायमंडळासमोर हजर केले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुपा पोलीस स्टेशनने म्हसणे फाटा व सुपा एमआयडीसीतील सर्व कंपनी व्यवस्थापकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने कॉन्ट्रॅक्टसाठी दमदाटी, पैशांची मागणी किंवा दबाव आणल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमआयडीसी क्षेत्रात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश नागरगोजे, मरकड, माळवदे, सातपुते, कोल्हे आणि गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून, पोलिसांच्या या सतर्कतेचे औद्योगिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.










