मुंबई / नगर सह्याद्री :
दक्षिण फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७९व्या कान्स चित्रपट महोत्सव मध्ये जगभरातील सिनेमा आणि फॅशन क्षेत्रातील नामांकित कलाकार सहभागी होत आहेत. भारतातूनही अनेक कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावली असून, दक्षिण भारतीय अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिच्या नव्या लुकची सध्या विशेष चर्चा रंगली आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कल्याणी कानमध्ये पोहोचली होती. सुरुवातीला तिने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पोशाखात भारत पॅव्हेलियनमध्ये सहभाग घेतला. तसेच एका विशेष पॅनल चर्चेतही ती सहभागी झाली होती. आता तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कल्याणीने ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे. तिचा हा लुक साधा पण अत्यंत एलिगंट असल्याचे चाहत्यांचे मत आहे. तिने पांढऱ्या रंगातील ज्वेलरी परिधान करून संपूर्ण लुक अधिक आकर्षक बनवला. विशेष म्हणजे तिच्या गळ्यातील नेकलेस पुढून छोटा तर मागच्या बाजूने लांब दिसत होता, ज्यामुळे तिच्या स्टाइलला वेगळेपणा मिळाला. दोन्ही हातांतील अंगठ्या आणि मोकळे सोडलेले केस यामुळे तिचा लुक आणखी उठून दिसत होता.
सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले. काहींनी तिला “सिंपल अँड क्लासी” म्हटले, तर काहींनी तिच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा केली. कानसारख्या जागतिक स्तरावरील महोत्सवात भारतीय कलाकारांचा वाढता सहभागही चर्चेचा विषय ठरत आहे.

कल्याणी प्रियदर्शन ही प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांची मुलगी आहे. ती मुख्यतः मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने सहाय्यक प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केले होते. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘हॅलो’ या तेलुगू चित्रपटातून झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.










