राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांचे प्रशासनाला निवेदन
पारनेर | नगर सह्याद्री
मांडओहोळ धरण परिसरात अचानक लागू करण्यात आलेल्या पाणी वापराच्या निर्बंधांमुळे कर्जुले हर्या, मानेवाडी, सावरगाव, काळेवाडी, गोडसेवाडी, शिंदेवाडी, गुरवेवाडी आणि वासुंदे या गावातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या निर्बंधांमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विशेष आर्थिक अनुदान द्यावे आणि जाचक निर्बंधांबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते अमोल उगले यांनी पारनेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो, मिरची यांसारख्या नगदी पिकांची लागवड करतात. यासाठी शेतकऱ्यांनी खते, बियाणे, औषधे, ठिबक सिंचन आणि मशागतीवर लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी उपशावर निर्बंध घातल्यामुळे उभ्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच नैसर्गिक संकटे आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे या निर्णयामुळे कंबरडे मोडले आहे.
निवेदन देताना भोंद्रे गावचे सरपंच अभिजीत झावरे, वारणवाडीचे सरपंच संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते अशोक खैरे, निलेश पवार, युवराज पाटील खिलारी, सुरेश झावरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. आकाश झावरे, मा. सरपंच अनिल तांबडे, पियुष कोकाटे, सचिन वाफारे, मयूर आंधळे, विवेक शिंदे, संपत फटांगरे यांच्यासह मांडओहळ परिसरातील शेतकरी, निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती
कोणतीही पूर्वसूचना न देता मांडओहोळ धरण परिसरात लागू केलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांना पाणी न मिळाल्यास टोमॅटो, मिरचीची उभी पिके जळून खाक होतील. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून विशेष अनुदान मंजूर करावे आणि या जाचक निर्बंधांचा पुनर्विचार करून बळीराजाला तातडीने दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे.
– अमोल उगले, नेते, टाकळी ढोकेश्वर जि. प. गट










