मविआमध्ये पारनेर तालुक्यात बिघाडीची चिन्हे
सुपा | नगर सह्याद्री
आघाडी असताना जर काँग्रेसला विचारात घेत नसाल, तर आम्हाला पण तुमची गरज नाही, असे ठणकावत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा पारनेर तालुका कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष रविश रासकर यांनी केली आहे.
कान्हुर पठार येथे आयोजित संयुक्त जयंती सोहळ्यात खासदार नीलेश लंके यांनी पुणेवाडीचे मारुती रेपाळे यांची जवळा जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी जाहीर केली. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसची आघाडी असताना घटक पक्षांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याने जवळा गटात चर्चेला उधाण आले आहे. सुपा गटामध्ये रवि रासकर यांच्या पत्नी चैतालीताई रासकर या उमेदवार आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या मविआमध्ये पारनेर तालुक्यात आता बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने सुपा जिल्हा परिषद गटासह तालुक्यातील इतर जागांवरल समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारी योजनांवरून सरकारला घेरले
काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा मनिषा ठुबे यांनी भाजप सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवरही जोरदार टीका केली. निवडणुकीपूव मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा सरसकट अनुदान दिले, आता मात्र एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच लाभ मिळतो. त्यामुळे घराघरात भांडणे लागली आहेत, असा आरोप त्यांनी केला. पीएम किसान योजनेत सुरुवातीला सर्व सामाईक खातेदारांना अनुदान दिले, आता फक्त एकालाच देत असल्याचे सांगत त्यांनी प्रश्न केला, सुरुवातीलाच असे निकष का लावले नाहीत? श्रावणबाळ व संजय गांधी योजना 31 ऑक्टोबर 2011 रोजी काँग्रेस सरकारने सुरू केल्या, मात्र भाजप सरकारने निकष न पाळता बोगस अनुदान वाटल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. बांधकाम कामगारांना भांड्यांचे वाटप फक्त प्रवरा नगर व अहिल्यानगर येथेच का केले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंजा दिसेल तिथे मतदान होणार
नेते मंडळींच्या मनात काही असले तरी कष्टकरी जनतेच्या मनात काँग्रेसच आहे, असे काँग्रेसचे कार्यकर्ते इंजि. सुभाष ठुबे म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला विचारात घेतले नसले तरी विधानसभा निवडणुकीत राणीताई लंके यांना भरघोस मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, खासदार लंके यांच्या काही हितचिंतकांनी कान्हुर पठार येथे मतदानापूव विरोधी उमेदवारांच्या पताका काढल्या. कार्यकर्त्यांना भान न राहिल्याने राणी लंके पराभूत झाल्या, यात आमचा काय दोष? असा सवाल त्यांनी केला.










