प्रवाशांना पेढे, बर्फी आणि गुलाबपुष्पांचे वाटप
शिरूर | नगर सह्याद्री
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे. सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासासाठी अधिकाधिक नागरिकांनी एसटी सेवेचा वापर करावा, अशी भावना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 78 व्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर बसस्थानकात आयोजित कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.
राज्यातील पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी पुणे-अहिल्यानगर मार्गावर धावली होती. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवष 1 जून हा दिवस एसटीचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीशिरूर बसस्थानकात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.वर्धापनदिनानिमित्त बसस्थानक परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. आकर्षक रांगोळ्या, फुलांची आरास, तोरणे तसेच फुलमाळांनी सजविलेल्या एसटी बसमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानंतर प्रवाशांना पेढे, बर्फी आणि गुलाबपुष्पांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी शिरूर आगाराच्या कामकाजाची माहिती देताना सांगितले की, शिरूर बसस्थानकात 250 हून अधिक कर्मचारी कार्यरत असून दररोज 193 बसगाड्या विविध मार्गांवर धावतात. तसेच सुमारे 3 हजार विद्याथ-विद्यार्थिनी एसटीच्या सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी एसटी ही अत्यंत महत्त्वाची सेवा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रा. सतीश धुमाळ यांनी आपल्या मनोगतात एसटी ही सुरक्षित प्रवासाची हमी देणारी सेवा असून ग्रामीण भागाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासात तिचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक एन. बी. हवालदार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आर. बी. लंके, वाहतूक नियंत्रक डी. जी. दहिफळे, भरत माने, माधव मुंडे, चंद्रकांत वेताळ, सुनील देवरे, समीर झगडे, बाबू भोसले, वाहन परीक्षक सुनील जगताप, गणेश खटके, बापू फलके, वैशाली दांडेकर, आदर्श गंगावणे, सुजाता साबळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन माधव मुंडे यांनी केले, समीर झगडे यांनी आभार मानले.










