मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शेतजमीन विक्रीच्या वादातून सासऱ्याचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जावई, मुलगा आणि सून हे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी Bapu Ananda Gadhave (वय ६०, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा Akash Bapu Gadhave (वय २६) यांनी दाखल केली होती. मात्र बराच काळ शोध घेऊनही बेपत्ता व्यक्तीचा मागमूस लागला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक Somnath Gharge यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक KiranKumar Kabadi यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान तक्रारदार आकाश गाढवे याच्यावर संशय निर्माण झाला. अधिक तपास करताना सुनिल रामदास राठोड याचा माग काढण्यात आला.
पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील शेगाव परिसरात छापा टाकला असता आरोपी Sunil Ramdas Rathod (वय ३७) हा मित्राच्या घरी लपून बसल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच तो घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. शेतजमीन विकून पैसे मिळवण्यासाठी मयत बापू गाढवे यांच्यावर दबाव टाकला जात होता. मात्र त्यांनी जमीन विकण्यास नकार दिल्याने ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी घरातच त्यांचा उशीने तोंड दाबून व गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर घराजवळ लाकडे गोळा करून डिझेल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यात आला.
या गुन्ह्यात Akash Bapu Gadhave, त्याची पत्नी पायल उर्फ आकांक्षा गाढवे तसेच प्रथमेश उर्फ भावेश चांदुरकर आणि अमोल लाटकर यांचा सहभाग असल्याचे आरोपीने कबूल केले. यापैकी आकाश गाढवे पोलिसांच्या ताब्यात असून इतर आरोपी फरार आहेत.
दरम्यान, चौकशीदरम्यान आरोपी सुनिल राठोड याने आणखी एक खळबळजनक गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे Sheetal Limbaji Songewad हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचा खून करून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धनेगाव परिसरात मृतदेह अर्धवट जाळल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), २३८ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक Somnath Gharge यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.










