भाजप प्रवेशाच्या चर्चां | अधिकृत भूमिका मात्र अद्याप स्पष्ट नाही
पारनेर | नगर सह्याद्री
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या पारनेर दौऱ्यात माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. युवक मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमाला अडसूळ यांनी उपस्थित राहून महाडीक यांचे स्वागत केल्याने तालुक्यात विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नगरपंचायतीच्या राजकारणात खासदार नीलेश लंके यांच्या गटासोबत सक्रिय मानले जाणारे नितीन अडसूळ यांनी भाजपच्या प्रमुख कार्यक्रमात हजेरी लावल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमादरम्यान अडसूळ यांनी महाडीक यांच्याशी संवाद साधल्याचेही उपस्थितांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.
दिवसभर पारनेरच्या राजकीय वर्तुळात अडसूळ यांच्या उपस्थितीवर चर्चा रंगली होती. काहींनी याकडे केवळ शिष्टाचार भेट म्हणून पाहिले, तर काहींनी हा भविष्यातील राजकीय बदलाचा संकेत असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र, अडसूळ किंवा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
महाडीक यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळीच राजकीय किनार मिळाली. येत्या काही दिवसांत नितीन अडसूळ यांची भूमिका काय राहणार आणि त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत कोणता निर्णय होणार, याकडे आता पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.










