अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जेऊर व इमामपूर शिवाराच्या सीमेवरील तोडमल वस्ती परिसरात मंगळवार रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सूरज तोडमल हे आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम करत असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यावेळी बिबट्या तोडमल यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. मशागतीसाठी सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या मोठ्या आवाजामुळे बिबट्या दचकला आणि त्याने आपल्या भक्ष्याचा पाठलाग सोडून जवळील झुडपांच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या त्या कुत्र्याला अक्षरशः जीवदान मिळाले. या प्रकारानंतर सुमारे अर्धा तास बिबट्या त्याच परिसरात तळ ठोकून होता.
यापूव जेऊर पंचक्रोशीत बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. चापेवाडी, तवले वस्ती, भवानी माता डोंगर परिसर, डोणी, गवारे वस्ती, खंडोबा माळ, पिंपळगाव तलाव, शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, ठोंबरे मळा, माळखास, धुरकुंड परिसर, खारोळी नदीच्या तीरावर अनेक वेळेस बिबट्याने दर्शन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या निदर्शनास आला नव्हता. परंतु कालच्या घटनेने पुन्हा जेऊर परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
जेऊर पंचक्रोशीत असणाऱ्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये बिबट्याचे वास्तव्य नेहमीच आढळून आलेले आहे. जेऊरसह इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा, खोसपुरी, उदरमल, पांगरमल या परिसरातही बिबट्याकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. डोंगर रांगांमध्ये सहज उपलब्ध होणारे अन्न, लपण व पाणी यामुळे बिबट्यांसाठी हा परिसर नंदनवन ठरत आहे.
जेऊर परिसरातील घटनेनंतर वन विभागाच्या वतीने वनपाल मनेष जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या. तसेच परिसरात जनजागृती करून बिबट्यापासून काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्या झुडपात गेला
मी शेतात ट्रॅक्टरने मशागत करत होतो. अचानक काही अंतरावर बिबट्या दिसला. तो पाळीव कुत्र्याच्या मागे होता. ट्रॅक्टरचा आवाज होताच बिबट्या घाबरून झुडपात निघून गेला. काही क्षणांसाठी अंगावर काटा आला होता. घटनेनंतर सुमारे अर्धा तास बिबट्या त्याच परिसरात ठाण मांडून होता.
-सुरज तोडमल (शेतकरी)
नागरिकांनी काळजी घ्यावी
जेऊर परिसरात बिबट्याचा वावर वारंवार आढळून आलेला आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांची विशेषता लहान मुलांची काळजी घ्यावी. पशुधन बंदिस्त जागी बांधावे. परिसर स्वच्छ ठेवावा. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग अथवा छेड न काढता वन विभागाशी संपर्क साधावा. वनविभाग बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.
मनेष जाधव (वनपाल, वनविभाग)










