पारनेर | नगर सह्याद्री
पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून तालुक्याच्या उत्तर भागातील मांडओहळ हा सध्या एकमेव महत्त्वाचा पाण्याचा उद्भव शिल्लक राहिला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनत असताना या उद्भवावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मांडओहळ येथील उद्भवावरून शासनाचे सुमारे 30 ते 35 टँकर दररोज भरले जातात. याशिवाय अनेक खासगी टँकरही याच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या खासगी टँकरांची कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. मोफत पाणी वितरणाच्या नावाखाली सुरू असलेली ही अवैध पाण्याची तस्करी प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरत आहे.विशेष म्हणजे, टँकरद्वारे पाण्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक टँकर कोणत्याही प्रकारच्या नोंदणी क्रमांकाविना किंवा शासनाने दिलेल्या ओळखचिन्हांशिवाय पाणी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकाराची कोणतीही माहिती नसल्याचे सांगत हात झटकले.मांडओहळ येथील पाण्याच्या उद्भवावर देखरेखीसाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त नसल्याचे चित्र आहे.
पाणी भरणाऱ्या टँकरांच्या खेपांची नोंद ठेवण्यासाठी नोंदवहीही उपलब्ध नाही. केवळ ऑनलाइन कामकाजाच्या नावाखाली संपूर्ण व्यवस्था सुरू असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अवैध पाणी उपसाला खतपाणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.मांडओहळ धरण परिसरातील काही शेतकरीही वैयक्तिक कूपनलिका तसेच विहिरीच्या माध्यमातून पाण्याची विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक संघर्ष करत असताना दुसरीकडे पाण्याचा अवैध व्यापार सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.टाकळी ढोकेश्वर, पिंपळगाव रोठा, कान्हूर पठार, नांदूर पठार, सावरगाव, पारनेर शहर, वासुंदे, कार्जुले हर्या, वेसदरे, पिंपरी पठार आदी गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान, मांडओहळ धरणात सध्या अवघा पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाला पाणी व्यवस्थापन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सुरू असलेल्या अवैध पाणी उपसा आणि विक्रीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
गेल्या एक महिन्यापूव पारनेर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासनाची विशेष पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पाणी व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पारनेर तालुका हा दुष्काळी असल्याने येथे पाणीटंचाई गंभीर बनते. त्यामुळे याकडे प्रशासनाने पाणी व्यवस्थापनाबाबत योग्य नियोजन करावे, असे सांगितले होते. परंतु त्यांच्या या सूचनेचे अधिकाऱ्यांकडून पालन होताना दिसत नाही. पालकमंत्री यांच्या आदेशालाच अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.










