- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन, काय घडलं पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या बहुप्रतीक्षित पावसाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात झाली. ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या जयघोषात सभागृहाचे कामकाज सुरू झाले असले, तरी प्रत्यक्ष कामकाजापूर्वीच विधानभवनाचा परिसर विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने आणि आंदोलनाने गाजला. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, तर दुसरीकडे सरकारने आगामी काळासाठी तब्बल ९७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करत मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे.

अधिवेशनाचे सत्राला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत महायुती सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी हातात बॅनर घेऊन सरकारचा निषेध केला. “नको अटी, नको शर्ती…; शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीकड शब्दांत प्रहार केला. “महायुतीने सत्तेत येताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर भरमसाठ अटी आणि शर्ती लादून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सरकारने आपले वचन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील नद्या, नाले, धरणे आणि तलाव कोरडे पडले असून भूजल पातळी कमालीची खालावली आहे. गावागावांत पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि यावर तातडीने विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संवेदनशील मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यादेवींच्या माहेरात लेकी गहिवरल्या, जावई भारावले....

पहिल्या दिवसाच्या कामकाजात राज्य शासनाच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या ९७ हजार ७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या. विशेष म्हणजे, विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यात ‘शेतकरी कर्जमुक्ती योजने’साठी तब्बल २० हजार ५५२ कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. या पुरवणी मागण्यांवर येत्या २९ आणि ३० जून २०२६ रोजी सभागृहात सविस्तर चर्चा आणि मतदान होणार आहे.

पहिल्या दिवशी विविध विधेयके, पुरवणी मागण्या आणि दिवंगत नेत्यांना शोकप्रस्ताव मांडून दोन्ही सभागृहांचे कामकाज संपवण्यात आले. पहिल्या दिवसाचा हा संघर्ष पाहता, आगामी काही दिवसांत हे अधिवेशन अधिकच गाजणार आणि शेतकरी व दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगणार, हे स्पष्ट झाले आहे.

“सरकारने विश्वासघात केला”, शेतकरी कर्जमाफीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला महाआंदोलन
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटींवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकारने दिलेला शब्द पाळला नाही –
पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा उल्लेख करताना रोहित पवार म्हणाले की, “२६ शेतकऱ्यांसह आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती करत २२ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात आहे.”

४४ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, योजनेतील कठोर अटींमुळे राज्यातील सुमारे ४४ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. राज्यातील ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अत्यल्प शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ही केवळ नावापुरती कर्जमाफी असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा :  विहिरीत कार कोसळून नऊ, कालव्यात तीन जणांचा मृत्यू

… तर राज्यभर तीव्र आंदोलन –
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देताना रोहित पवार म्हणाले, “२९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने विशाल आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारला ३० जूनपर्यंतचा अवधी देत आहोत. कर्जमाफीतील जाचक अटी मागे न घेतल्यास आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येईल.” विधान परिषद निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना त्यांनी महायुतीवरही निशाणा साधला. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराच्या विजयाचा उल्लेख करत त्यांनी मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सांगितले. भाजप केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात अनेक भागांत दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसल्याची, शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याची तसेच विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची टीका करत, सरकारने निर्णय बदलत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ