मुंबई / नगर सह्याद्री –
पुण्यातील महापौर कार्यालय, विधान भवन आणि नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. महापौर कार्यालयाला हा धमकीचा ईमेल आल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी तीन ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाणार असल्याचा मेल संबंधित कार्यालयांना मिळाला आहे.
पुण्यातील महापौर कार्यालयासह, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि विधान भवन या तिन्ही मुख्य कार्यालयांना धमकी देण्यात आली आहे. आरएसएसने ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिला होता याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करणार असल्याचं धमकीच्या मेल मध्ये म्हटलंय.सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी महापौर कार्यालयाला मेल प्राप्त झाला होता. धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि सायबर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले आहे.










