- जाहिरात -spot_img
breaking news

दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूने हल्ला, हुंड्यासाठी छळ, वॉचमनवर हल्ला, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट भोवली…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर चाकूने हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका 31 वषय मजुरावर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी तुषार सुदाम उमाप (वय 31 वर्ष, व्यवसाय मजूरी, सध्या रा. गाझी नगर, अहिल्यानगर) हे रविवारी (26 जुलै) रात्री आठ वाजेच्या सुमारास माळीवाडा येथील जिल्हा परिषद इमारतीसमोरून जात होते. यावेळी संशयित आरोपी रवि उत्तम साठे (रा. भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर) याने उमाप यांना रस्त्यात अडवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

फिर्यादी तुषार उमाप यांनी दारूसाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी रवि साठे याने उमाप यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने स्वतःजवळील चाकू काढून उमाप यांच्या हातावर वार करून त्यांना दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.घटनेनंतर जखमी तुषार उमाप यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उमाप यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी आरोपी रवि उत्तम साठे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक वर्षा पंडित या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

20 लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
घर बांधण्यासाठी माहेरहून 20 लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका 36 वषय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि दिर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह 2016 मध्ये झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ व्यवस्थित गेल्यानंतर पती नोकरीनिमित्त परदेशी गेला. त्यानंतर काही दिवसांनी पतीने संशय घेऊन आणि दारूच्या मद्यधुंद अवस्थेत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. भारतात परतल्यानंतरही आरोपी पतीने दारू पिऊन तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरहून 20 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी लावून धरली. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे विवाहितेला उपाशी ठेवून तिचा अमानुष छळ करण्यात आला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने यापूव पोलीस ठाण्यात आणि भरोसा सेल येथे तक्रारी अर्ज दिले होते. तरीही आरोपींच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नाही.नुकतेच जुलै महिन्यात आरोपी पतीने आणि दिराने मोबाईलवरून फोन तसेच मेसेज करून पीडितेला पुन्हा धमक्या दिल्या. अखेर भरोसा सेलचे पत्र घेऊन पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिर यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  रविराज साबळे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या

अहिल्यानगरमध्ये कौटुंबिक वादातून महिलेवर हल्ला; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – शहरातील दातरंगे मळा परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेला तिच्या पतीने लाकडी दांडक्याने आणि धारदार शस्त्राने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी जेवण करून झोपण्याची तयारी सुरू असताना पतीने विनाकारण चरित्रावर संशय घेतला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर पतीने रागाच्या भरात बेछूट शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ​इतक्यावरच न थांबता, पतीने घरातील धारदार शस्त्राने उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच मुलांना आणि पीडित महिलेला जीवे मारण्याची थेट धमकी दिली. या हल्ल्यामध्ये महिला जखमी झाली आहे.

​घटनेनंतर पीडित महिलेने त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

माळीवाडा बसस्थानकात जुन्या वादातून वॉचमनवर चाकूने हल्ला; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरात क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय वॉचमनवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना काल सायंकाळी घडली. या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगर येथील रहिवासी गौतम हिरामन खरात हे वॉचमन म्हणून काम करतात. काल रात्री पावणेआठच्या सुमारास ते माळीवाडा बसस्थानक परिसरातून जात असताना चंदा नावाच्या व्यक्तीने त्यांना अडवले. आरोपीने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने खिशातून चाकू काढून गौतम यांच्या उजव्या गालावर जोरदार वार केला.
​चाकूचा वार बसल्याने गौतम खरात हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. आसपासच्या लोकांनी जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा :  पाणी योजना यशस्वी पद्धतीने चालविण्याचे दिले धडे; संदेश कार्ले यांचे अधिकार्‍यांना मार्गदर्शन

​घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पीडित गौतम खरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंदा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
​पोलीस अंमलदार भानुदास सोनवणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस शिपाई दीपाली भालेराव पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

कामरगाव येथे शेळ्या हुसकावल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला
​अहिल्यानगर – नगर तालुक्यातील कामरगाव येथे शेतात बाजरीचे पीक खात असलेल्या शेळ्यांना हाकलून लावल्याचा राग मनात धरून ५० वर्षीय नागरिकाला काठी व लोखंडी गजाने गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, कामरगाव येथील रहिवासी हरिश्चंद्र विनायक साळी (वय ५०) हे १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी गावातीलच आरोपी संगिता विठ्ठल शितोळे, पांडुरंग विठ्ठल शितोळे आणि यश नामदेव खोमणे हे तिघे हातात काठी व लोखंडी गज घेऊन त्यांच्या समोर आले. “आमच्या शेळ्यांना दगड का मारला?” असा जाब त्यांनी विचारला.
​त्यावर, “शेळ्या शेतातील बाजरीचे पीक खात असल्याने त्यांना फक्त पळवून लावले, दगड मारला नाही,” असे हरिश्चंद्र साळी यांनी सांगितले. या उत्तराचा राग आल्याने तिन्ही आरोपींनी संगनमत करून साळी यांना शिवीगाळ करत काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची दमदाटी केली.
​मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हरिश्चंद्र साळी यांना नागापूर येथील भैरवनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर तालुका पोलिसांनी आरोपी संगिता शितोळे, पांडुरंग शितोळे आणि यश खोमणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर कारवाई
​अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसिद्ध केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार येथील पंचशील कमानीजवळ २६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी कार्तिक भुतकर आणि शुभम भुजबळ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निळे कबुतर व हिरवे कबुतर अशा आशयाची पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे दोन धर्मांमधील एकोपा बिघडण्याची आणि शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
​या प्रकरणी भीम नगर, भिंगार येथील रहिवासी सिद्धार्थ कृष्णा आढाव (वय ३३) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कार्तिक भुतकर आणि शुभम भुजबळ यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ (१) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
​सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ