- जाहिरात -spot_img
breaking news

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड

पुणे / नगर सह्याद्री –
पुणे शहरात ऑनलाईन गेमिंग आणि सट्टा लावून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या हायटेक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरात पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून हे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. या रॅकेटचे थेट ‘दुबई कनेक्शन’ समोर आलं असून, पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

मुंढवा पोलीस आणि सायबर विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका इमारतीमध्ये हे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना फोन करून ‘ऑनलाईन गेम’ खेळून घरबसल्या लाखो रुपये कमावता येतील, असे आमिष दाखवायचे.

विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला लोकांना गेम खेळून जिंकलेले काही पैसे दिले जायचे. मात्र, एकदा का संबंधित व्यक्ती मोठी रक्कम लावून गेम हरली की, कॉल सेंटरमधून पुन्हा फोन करून ‘पैसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी आहे’ असं भासवलं जायचं. एकदा का ती व्यक्ती जाळ्यात अडकली की, त्याला विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून त्याची संपूर्ण फसवणूक केली जात असे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने त्याच्याकडे काम करणाऱ्या निष्पाप कर्मचाऱ्यांची शासकीय ओळखपत्रे गोळा केली होती. त्यांचा गैरवापर करून त्यांच्याच नावे शेकडो सिम कार्ड्स आणि बनावट बँक खाती उघडण्यात आली होती, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये.

दोन जणांना अटक
या रॅकेटची माहिती मिळताच पोलिसांनी गुप्त सापळा रचून या कॉल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष दत्ता वेंजणेकर आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा :  मैत्रिणीच्या आईच्या प्रियकराचा खून! प्रेमसंबंधांच्या वादातून धक्कादायक कृत्य, काय घडलं पहा

छापेमारी दरम्यान पोलिसांनी कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये लॅपटॉप, हार्ड डिस्क, ऑटो डायलर मशीन, शेकडो सिम कार्ड्स, विविध कंपन्यांचे बनावट शिक्के, बँक पासबुक आणि चेक बुक्स जप्त करण्यात आली आहेत.

मुख्य सूत्रधार दुबईत सक्रिय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा दुबईत बसून या हालचाली नियंत्रित करत असल्याचे समोर आलं आहे. भारतातून जमा होणारा सर्व पैसा हवाला किंवा डिजिटल माध्यमातून हाताळण्यासाठी त्याचा एक खास सहकारी इतर आर्थिक व्यवहार पाहत होता. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिस करत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाईन गेमिंग आणि पैशांचे आमिष दाखवणाऱ्या फोन कॉल्सला बळी पडू नये, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ