पारनेर | नगर सह्याद्री
आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल 112 या महत्त्वाच्या यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या एका इसमावर पारनेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. दारूच्या नशेत असताना 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलै 2026 रोजी निघोज दूरक्षेत्रातील डायल 112 नियंत्रण कक्षाला एक कॉल प्राप्त झाला. गोरख भास्कर सोनवणे (रा. सोनवणे वस्ती, राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) याने फोन करून राळेगण थेरपाळ परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती दिली. हा कॉल गांभीर्याने घेत पारनेर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सागर साबळे, संपत गुंड आणि होमगार्ड बाराहाते यांनी तातडीने राळेगण थेरपाळ गाठले.घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून पाहणी केली. मात्र, तिथे कोणतीही अवैध दारू विक्री सुरू असल्याचे आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी कॉल करणाऱ्या गोरख सोनवणे याच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने आरडाओरड करून, मी मुद्दामच खोटा कॉल केला होता, अशी कबुली दिली. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणे आणि पोलिसांना विनाकारण कामात गुंतवून प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करणे या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर शिवाजी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मारुती कोळपे हे करत आहेत.
अण्णा जिंकले, सरकार झुकले










