तनपरे यांचा प्रवेश निश्चित / 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; विश्वसनीय सूत्रांची माहिती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री असलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. तनपुरे 30 मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची सुत्रांची माहिती आहे. तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसणार आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहिल्या नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना विधान परिषदेतून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखविली होती नाराजी
दरम्यान राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. मात्र दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चाललंय, याचे दुःख आहे, अशी भावना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावू वाटलं. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहील त्याचे राजकारण संपतंय. याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती असल्याचं बोलत प्राजक्त तनपुरे यांनी नाराजी बोलून दाखवली होती.
फेसबुक प्रोफाईल बदलला
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलला आहे. त्यांनी फेसबूक डीपीमध्ये जयंत पाटील यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढेल.
राष्ट्रवादीचे सचिन जगताप निवडणूक रिंगणात
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन अरुणकाका जगताप यांनीही विधानपरिषद निवडणुकीसाठी शड्डू ठोकले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे स्व.अरुणकाका जगताप यांची दोन वेळा विधानपरिषदेची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असून, आमदार संग्राम जगताप यांचे ज्येष्ठ बंधू सचिन जगताप हे प्रबळ दावेदार आहेत. नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी आज सचिन जगताप यांच्यासाठी तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.










