चौंडीत रंगला लेक-जावयांचा धोंडे जेवण व सन्मान सोहळा
जामखेड | नगर सह्याद्री
आई-वडील, भाऊ आणि बालमैत्रिणींची अनेक वर्षांनंतर झालेली भेट, सुख-दुःखाच्या आठवणींना मिळालेला उजाळा आणि संपूर्ण गावाकडून झालेला सन्मान… या भावनिक क्षणांनी चौंडीच्या लेकींचे डोळे पाणावले, तर गावकऱ्यांनी केलेल्या आदरातिथ्याने जावई भारावून गेले. पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे अधिक मासानिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला लेक-जावयांचा धोंडे जेवण व सन्मान सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीचे औचित्य साधत आयोजित या उपक्रमात राज्यभरातून 700 हून अधिक लेक-जावई सहभागी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांसह सुमारे चार हजार नागरिकांच्या उपस्थितीने चौंडी गाव गजबजून गेले होते. एखाद्या गावाने आपल्या लेक-जावयांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मान सोहळा आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याची चर्चा यावेळी होती.
सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक जावयाचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर फेटे बांधून गंधाक्षता लावण्यात आली. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी तथा जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. आशाताई शिंदे यांच्यासह गावातील महिलांनी हा स्वागत सोहळा पार पाडला. यानंतर अहिल्यादेवींनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक अहिल्येश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. वैजापूरच्या प्रसिद्ध बँड पथकाने सादर केलेल्या गाण्यांवर लेकी-जावई, तरुणाई आणि ज्येष्ठांनीही ठेका धरला. काही जावयांनी पत्नींना उचलून घेत नृत्य केल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या अनोख्या सोहळ्यात पारंपरिक धोंडे जेवणाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. तब्बल 100 किलो पुरण वापरून पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या. पुरणाचा धोंडा, साजूक तूप, दूध गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड आणि कुरडई अशा अस्सल ग्रामीण मेजवानीने पाहुण्यांची मने जिंकली.विशेष म्हणजे, या जेवणासाठी लागणाऱ्या बहुतांश पुरणपोळ्या गावातील महिलांनी स्वतः तयार केल्या. पाहुण्यांना आग्रहाने वाढण्यात येणाऱ्या या जेवणामुळे जुन्या ग्रामीण परंपरेची आठवण सर्वांना झाली.
रामभाऊंमुळे आमचा अभिमान द्विगुणित
या सोहळ्यात भावना व्यक्त करताना अनेक महिला गहिवरून गेल्या. अहिल्यादेवींच्या माहेर गावच्या लेकी असल्याचा आम्हाला कायम अभिमान आहे. मात्र आज गावाने आमच्या पतींचा केलेला सन्मान आणि अनेक वर्षांनी झालेली मैत्रिणींची भेट हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. लताबाई गावडे-देवकर, उषा लोखंडे, शार्दुल निंबाळकर, सुरेखा उबाळे यांच्यासह अनेक महिलांना बोलताना अश्रू अनावर झाले. जावई मंडळींच्यावतीने भावना व्यक्त करताना नाना करंजले म्हणाले, चौंडीचा दाजी म्हणून आम्हाला नेहमीच प्रेम मिळते. मात्र संपूर्ण गावाने दिलेला हा सन्मान आमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. हा मान आम्ही कधीही विसरणार नाही.
चौंडीला जागतिक ओळख देण्याचा प्रयत्न : प्रा. राम शिंदे
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, गावच्या लेकींचा भाऊ या भावनेतून हा धोंडे सन्मान सोहळा आयोजित केला आहे. लेकींनी माहेर आणि सासरची नाती जपत चौंडीचा लौकिक वाढविला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. पुण्यलोक अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चौंडी गावाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी विकासकामे सुरू आहेत. लेक-जावयांनीही गावाशी नाळ कायम जोडून ठेवावी आणि विकासात सहभागी व्हावे.










