पारनेरला वादळी पावसाचा तडाखा
झाड पडल्यामुळे वारणवाडी-पोखरी रस्ता बंद!
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या वारणवाडी आणि पोखरी परिसराला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब (लाईटचे पोल) उन्मळून पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जवळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने केळी, पपई, डाळिंब तसेच आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या.सोलर पंपावरील साहित्य उडून गेल्याने सोलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील वारणवाडी आणि पोखरी परिसराला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे परिसरातील शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, वारणवाडी परिसरात शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवलेले लाखो रुपयांचे सौर पॅनल जमिनीवर कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब (लाईटचे पोल) उन्मळून पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वादळामुळे पोखरी व वारणवाडी रस्त्यावर एक मोठे बाभळीचे झाड मुळासकट उपटून पडले. यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावरील झाडे हटवण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आगामी उन्हाळा व पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेला जनावरांचा वाळलेला चारा पूर्णपणे भिजला असून, त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांचे किरकोळ स्वरूपातही नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू
वारणवाडी आणि पोखरी परिसरात झालेल्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सौर पॅनल, विजेचे पोल आणि झाडे पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून चाराही वाया गेला आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी व शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– संजय काशीद,सरपंच, वारणवाडी










