पतीचा मृत्यू अटळ, भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण
नाशिक | नगर सह्याद्री
भोंदूबाबा अशोक खरातचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्याच्या विरोधात आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे खरातविरोधात महिलांच्या तक्रारींची संख्या १९ वर पोहचली आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी खरात विरोधात पोलिसांत धाव घेतली.
भोंदू अशोक खरातने या महिलांना भीती दाखवली होती. पतीचा मृत्यू अटळ आहे तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातने त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. अशोख खरात प्रकरणाचा नाशिक पोलिस, एसआयटी आणि आता ईडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटीच्या पथकाने तपासणी केली. एसआयटीचे पथक मंगळवारी दोन वेळा खरातच्या कार्यालयात गेले होते. त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी एसआयटीच्या पथकाने त्याच्या कार्यालयाची झडती घेतली.
दरम्यान, भोंदू अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात विरोधातील दुसर्या गुन्ह्यातील ७ दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्यानं पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरातविरोधात दाखल तिसर्या गुन्ह्यात एसआयटीकडून खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडून देखील ऑनलाईन व्हिसीद्वारे सुनावणीसाठी विनंती अर्ज केला जाणार आहे. न्यायालयाने विनंती अर्ज मान्य केल्यास ऑनलाईन व्हिसीद्वारे सुनावणी होईल. मात्र न्यायालयाने विनंती अर्ज अमान्य केल्यास खरातला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करून सुनावणी होईल.










