पारनेर / नगर सह्याद्री :
कुकडी डावा कालव्याला तात्काळ पाणी न सोडल्यास मंगळवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निघोज एसटी बसस्थानक परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत हा इशारा देण्यात आला.
डॉ. भास्करराव शिरोळे आणि ठकारामलंके यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर थेट हल्लाबोल केला. “महायुती सरकार शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी करत आहे. धरणांत पाणी असताना ते वेळेवर न सोडणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे,” असा आरोप त्यांनी केला.
मध्यरात्रीपर्यंत पाणी न आल्यास आंदोलन अटळ
शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, सोमवार दि. २ मार्च मध्यरात्रीपर्यंत कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे ठोस आश्वासन मिळाले नाही तर मंगळवारी रास्ता रोको अटळ आहे. याबाबत पारनेर तहसीलदार व पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
पिके जळण्याच्या मार्गावर
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वेळेवर पाणी न मिळाल्यास कांदा, कडवळ, घास आणि हिरवा चारा ही पिके जळून जाण्याची भीती आहे. आधीच शेतीमालाला योग्य भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि शेतकरी खासगी बँका व पतसंस्थांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अशा परिस्थितीत पाणी न देणे म्हणजे शेतकऱ्यांना हतबल करण्याचे धोरण असल्याचा आरोप करण्यात आला.
‘जबाबदारी सरकारचीच’
“पुणे जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणी असूनही नियोजनबद्ध पाणी सोडले जात नाही. ही केवळ वेळकाढूपणाची भूमिका आहे. आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील,” असा इशाराही देण्यात आला.
या शिष्टमंडळात स्थानिक पदाधिकारी, माजी सरपंच, बाजार समितीचे सदस्य आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. निवेदनावर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. ३ मार्चपर्यंत पाणी न सुटल्यास निघोजमध्ये वातावरण तापणार असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.










